19 December 2018

News Flash

कल्याणच्या चार तरुणांना आयसिसमध्ये जाण्यासाठी मदत करणारा रेहमान गोळीबारात ठार

रेहमानची पत्नी भारतात परतल्याचीही माहिती समोर

संग्रहित छायाचित्र

अफगाणिस्तानचा नागरिक आणि महाराष्ट्र एटीएसचा मोस्ट वॉन्टेड रेहमान दौलती याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला होता. मात्र ३० मे २०१७ लाच रेहमानला काबूल येथील त्याच्या राहत्या घराबाहेर झालेल्या चकमकीत तो मारला गेला अशी माहिती समोर आली आहे. रेहमानच्या पत्नीच्या नातेवाईकाने ही माहिती दिली.

रेहमानच्या पत्नीचे नाव यास्मिन आहे. यास्मिन आणि रेहमानचे लग्न २०११ मध्ये झाले होते. काही दिवस हे दोघे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे भाड्याच्या घरात रहात होते. दोन महिने तिथे राहिल्यावर हे दोघेही अफगाणिस्तानमध्ये जाऊन राहू लागले. अशी माहितीही यास्मिनच्या नातेवाईकाने दिली.

रमझानचा महिना सुरु होता, त्याच महिन्यात रेहमानला चकमकीत मारण्यात आले. रेहमानच्या मृत्यूची कल्पना त्याचा भाऊ रोशन याला आम्ही दोन महिन्यानंतर दिली असेही यास्मिनच्या नातेवाईकाने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. रेहमानची पत्नी यास्मिनला तिच्या आई वडिलांनी भारतात परतण्यासाठी सक्ती केल्यामुळे ती भारतात परतली आहे. मागच्याच महिन्यात आपल्या चार मुलांसह ती परतली आहे. मात्र तिने अफगाणिस्तानात परत यावे असा दबाव तिच्या सासू सासऱ्यांकडून टाकला जातो आहे असेही तिच्या नातेवाईकाने म्हटले आहे.

कल्याणमध्ये राहणारे अमन तांडेल, सहिम तानकी, आरिफ मजिद आणि फहाद शेख हे चौघेजण आयसिसमध्ये दाखल होण्यासाठी २०१४ मध्ये देशाबाहेर गेले होते. बगदादमार्गे ते आयसिसमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांना रेहमानने मदत केली होती. तेव्हापासूनच महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर रेहमान होता.

काय आहे प्रकरण?

सप्टेंबर २०१४ मध्ये महाराष्ट्र एटीएसने चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये दोन अफगाणिस्तानच्या रेहमान दौलती आणि मोहम्मद रतेब या दोघांचा समावेश होता. या दोघांसोबतच कल्याणच्या आदिल डोलारेवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नोंद असलेल्या माहितीप्रमाणे रेहमान नोव्हेंबर २०१३ मध्ये कल्याण मध्ये आला होता. तेथील राजा या हॉटेलमध्ये त्याचे वास्तव्य होते. आदिल डोलारे या कल्याणच्या हॉटेल मालकाने रेहमान हा आपला मित्र असल्याची माहिती दिली होती. रेहमान हा आपल्या व्यवसायातील भागीदार असून तो अफगाणिस्तानहून भेटण्यासाठी ला होता असे आदिल डोलारेने सांगितले.

२०१४ मध्ये रेहमान पुन्हा एकदा भारतात आला त्यावेळी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. एटीएसने त्याची काही वेळ चौकशी केली आणि मग त्याला सोडण्यात आले. रेहमानने चार तरुणांना आयसिसमध्ये भरती होण्यासाठी मदत केल्याच त्यावेळी समोर आले होते. आता याच रेहमानचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

 

 

 

First Published on March 9, 2018 9:28 am

Web Title: man who helped 4 youngsters from mumbai join isis shot dead in kabul