जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलाच्या कारवाईत जखमी झालेल्या आंदोलकांना भेटण्यास गेलेले काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अय्यर हे गुरूवारी काही शिष्टमंडळासह श्रीनगर येथील हॉस्पीटलमध्ये आंदोलकांची विचारपूस करण्यास गेले होते. परंतु संतप्त नागरिकांनी आम्ही मारेकऱ्यांशी हात मिळवत नसल्याचे म्हणत अय्यर यांना आल्यापावली परत पाठवल्याचे येथील एका डॉक्टरने सांगितले. नागरिकांनी फक्त पत्रकारांना हॉस्पीटलमध्ये प्रवेश दिला. या वेळी भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या.
अय्यर काही पत्रकारांसह हॉस्पीटलमध्ये आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्यांना विरोध केला. तसेच ‘इंडिया गो बॅक’ अशा घोषणा दिल्याचे हॉस्पीटलमधील स्वंयसेवक उबेद अहमदने माध्यमांना सांगितले. हॉस्पीटलमध्ये पॅलेट गनमुळे जखमी झालेले रूग्ण मोठयाप्रमाणात आहेत. ‘आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य हवे, इंडिया गो बॅक’ अशा घोषणा नागरिकांनी शिष्टमंडळासमोर दिल्या. या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते शबनम हाश्मी, आणि माजी एअर व्हाईस मार्शल कपिल काक यांचाही समावेष होता. आम्ही फक्त पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या रूग्णांची पाहणी करण्यासाठी आलो होतो, असे शिष्टमंडळाचे सदस्य बशीर असद यांनी या वेळी सांगितले. असद हे सत्ताधारी पीडीपीशी संबंधित आहेत. अय्यर हे काँग्रेसचे नेते असल्यामुळे कदाचित त्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले असेही असद यांनी म्हटले. या वेळी संतप्त नागरिकांनी पत्रकार प्रेम शंकर झा यांनाही परत पाठवले.
श्रीनगर येथील नागरिकांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. कारण काँग्रेसने नेहमी आपल्या राजकारणात अल्पसंख्यांक कार्डचा मोठा वापर केला आहे. त्यामुळे अय्यर यांना आलेल्या अनुभवाचा काँग्रेसला राजकीय धक्का बसला आहे.