मनमोहन सिंग यांचा मोदींना सल्ला; व्यापारी मेळाव्यात भाजपवर टीकास्त्र

नोटाबंदी तसेच वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीने जनतेला ज्या वेदना झाल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजल्याच नाहीत, असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी येथे मेळाव्यात केला.

काळ्या पैशाविरोधात निष्फळ ठरलेली ही मोहीम आहे, अशा शब्दांत सिंग यांनी टीका केली. यामुळे जनतेला त्रास झाला, खरे चोर मात्र सुटले, असा आरोप त्यांनी केला. कर दहशतवाद वाढला. जणू प्रत्येक व्यक्ती देशद्रोही आहे असे संशयाने पाहू लागले. हे चुकीचे आहे. राजकीय नेत्यांनी शालीनता पाळायला हवी असा सल्ला त्यांनी दिला. कर दहशतवादामुळे व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास कमी झाला असे मत त्यांनी व्यक्त केले.

नोटाबंदी व जीएसटीच्या अंमलबजावणीने मोठय़ा व छोटय़ा उद्योगांना फटका बसला. नोटाबंदीच्या धक्क्यातून जनता सावरत असताना, त्यांनी जीएसटीच्या रूपाने दुसरा धक्का दिला, अशी टीका सिंग यांनी स्थानिक व्यापाऱ्यांच्या सभेत केली.  विश्वासावर व्यवसाय चालतो. मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी व्यापाऱ्यांना करत त्यांनी सरकारवर टीका केली.

काँग्रेसचे नकली हिंदुत्व स्वीकरणे कठीण -जेटली

सुरत : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी देऊन काही साध्य होणार नाही. निवडणुकीच्या रिंगणात हिंदुत्ववादी पक्ष असताना नकली हिंदुत्ववाद्यांना जनता कशी मते देईल असा सवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उपस्थित केला आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वात भ्रष्ट होते असा आरोप जेटलींनी केला. नेतृत्वहीन असे ते सरकार होते. पंतप्रधान जरी कार्यालयात असले तरी त्यांना अधिकार नव्हते असा दावा जेटलींनी केला. १९८० च्या दशकात काँग्रेसने जातींचे ध्रुवीकरण करून राजकारण केले. त्याची किंमत गुजरातला मोजावी लागली असा आरोप जेटलींनी केला.