पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर जनतेनं शांती, एकतेचं दर्शन घडवलं, असं म्हणत मोदी यांनी सर्वांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा ५९वा भाग आज प्रसारित झाला. या कार्यक्रमात मोदींनी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर दिलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली. अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर होईल, तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जागा देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. या निर्णयावर मोदी यांनी भाष्य केलं.

काय म्हणाले मोदी?

“नऊ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला. या निर्णयामुळे देशात गोंधळाचे वातावरण निर्माण होईल, असं म्हटलं जात होतं. परंतु १३० कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, देशाच्या हितापेक्षा मोठं काहीच नाही. देशात शांती, एकता आणि सद्भावना कायम ठेवल्याबद्दल धन्यवाद,” असं मोदी म्हणाले. याचबरोबर मोदी यांनी महिलांसाठी नव्यानं सुरु केलेल्या ‘भारत की लक्ष्मी’ या योजनेबाबत माहिती दिली. “या योजनेमुळं महिलांचा विकास होईल. तसेच देशातील महिला सक्षमीकरणास मदत होईल”, असं मोदी म्हणाले.