ज्येष्ठ नेत्याकडून भाजपप्रवेशाचा अधिकारवाणीने इन्कार; राणेंची वाघेलांशी तुलना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबतचे गूढ आणखी वाढविताना भाजपच्या ‘अत्यंत महत्त्वाच्या नेत्या’ने या घडामोडींचा संपूर्ण इन्कार केला. राज्यातील भाजप नेत्यांकडून उलटसुलट संकेत दिले जात असताना या अत्यंत महत्त्वाच्या नेत्याने राणेंच्या भाजपप्रवेशाचा प्रस्ताव नसल्याचे ‘अधिकारवाणी’ने स्पष्ट केल्याने अधिक संभ्रम वाढला आहे.

‘राणेंच्या पक्षप्रवेशाचा प्रस्ताव नाही. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष चर्चा झालेली नाही. जी काही भेट झाली, ती एका सार्वजनिक समारंभामध्ये..’, अशी टिप्पणी या ‘अत्यंत महत्त्वाच्या नेत्या’ने अनौपचारिक चर्चेमध्ये केली. किंबहुना आणखी पुढे जात त्या नेत्याने राणेंची तुलना काँग्रेसला रामराम ठोकणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांशी केली. ‘वाघेला काँग्रेसमधून बाहेर पडलेत; पण त्यांना भाजपने पक्षात घेतलेले नाही. आमच्यात सहकार्य मात्र आहे,’ अशी बोलकी पुस्ती त्या नेत्याने जोडली. राणेंची तुलना वाघेलांशी करण्याचे अनेक अर्थ निघू शकतात.

राणेंच्या भाजपप्रवेशाच्या वावडय़ा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उठत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहांच्या २७ ऑगस्टच्या मुंबई दौऱ्यात राणेंचा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. मात्र, शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी केलेल्या गुफ्तगूमध्ये राणेंबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यातच दुसरीकडे फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्ताने राणेंच्या निवासस्थानी भेट दिल्याने तर पुन्हा एकदा सर्वाच्या भुवया उंचावल्या. या सगळ्या पाश्र्वभूमीवर या ‘अत्यंत महत्त्वाच्या नेत्या’ने राणेंबाबत हात वर केल्याने आणखीनच गूढ वाढले आहे. राणेंबाबत भाजपचे विविध नेते विविध पद्धतीने बोलत आहेत. मध्यंतरी दिल्लीत आलेल्या फडणवीसांनी राणेंबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता.

मध्यंतरी भाजपच्या आणखी एका वरिष्ठ केंद्रीय नेत्याने राणेंची भाजप वाट बिकट असल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले होते. ‘राणे यांची उपयुक्तता नक्कीच आहेच. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांना पक्षामध्ये घ्यावे लागेल. एकावर दोन मोफत घेण्यासारखा प्रकार आहे. त्या दोन्ही मुलांचे प्रताप पाहता, ते आमच्या पक्षामध्ये कितपत फिट्ट बसतील सांगता येत नाही. त्यामुळे राणेंचा प्रवेश रखडलाय. त्यांच्याबद्दल पक्षात दोन मतप्रवाह आहेत,’ असे त्या नेत्याने सांगितले होते.

फडणवीस मुंबईतच..

मुख्यमंत्री फडणवीसांना केंद्रामध्ये आणण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भाजपच्या ‘अत्यंत महत्त्वाच्या नेत्या’ने स्पष्ट केले. त्यामुळे फडणवीसांना दिल्लीत आणण्याबाबतच्या चर्चेचा फुगा फुटल्याचे मानण्यात येत आहे.

अशोक चव्हाण यांचे मौन

पंढरपूर : राज्यात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सक्षम आहे. राष्ट्रवादीवर अवलंबून नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले. तर नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत टाळून त्यांनी मौन बाळगले. पंढरपूरमध्ये ते बोलत होते.राज्यात काँग्रेस पक्ष सक्षम असून सरकारच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवत आहे. पक्ष वाढविण्यास आमचा प्राधान्यक्रम. राष्ट्रवादीवर अवलंबून आम्ही नाही. जर सोबत आले तर स्वागतच आहे असे म्हणत चव्हाण यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले.