बुधवारी फेसबुकच्या शेअर्सच्या भावांनी आपटी खाल्ली आणि कंपनीचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग याच्या ऐश्वर्यालाही चांगलीच झळ बसली. अवघ्या दोन तासांमध्ये फेसबुकच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी कोसळला आणि मार्क झकरबर्गची श्रीमंती तब्बल 16.8 अब्ज डॉलर्सनी कमी झाली. आता मार्क झकरबर्गच्या ताब्यात असलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य सुमारे 70 अब्ज डॉलर्स आहे जे बुधवारी सकाळी 84 अब्ज डॉलर्सच्या आसपास होते.

जगातल्या अतिश्रीमंतांचाही विचार केला तरी एका दिवसात 16.8 अब्ज डॉलर्सची होळी होणं म्हणजे दिवाळं निघणं असाच आहे. परंतु मार्क झकरबर्गसाठी ही रक्कम त्याच्या संपत्तीच्या एक पंचमांश आहे. फेसबुकवर लोकं विश्वासानं देत असलेली माहिती किती सांभाळली जाते, तिचं रक्षण केलं जातं ना, जाहिरातदारांसाठी काय नियम आहेत या आणि अशा अनेक प्रश्नांवरून गेली काही वर्षे फेसबुकवर टिका होत आहे. परंतु आत्तापर्यंत याचा परिणाम फेसबुकच्या उत्पन्नावर झाला नव्हता. बुधवारी मात्र फेसबुकनं दुसऱ्या तिमाहीचे निकाल सांगितले. अपेक्षेएवढी वाढ फेसबुकला साधता आलेली नाही हे जसे स्पष्ट झाले त्याचप्रमाणे येत्या सहा महिन्यांमधली उत्पन्नाची वाढही अपेक्षेएवढ्या गतीने वाढणार नसल्याचे समोर आले.

अचानक असं काय झालं आणि फेसबुकच्या उत्पन्नासंदर्भातले अंदाज इतके कसे चुकले असे तज्ज्ञ विचारत असतानाच बाजारात मात्र त्याचा विपरीत परिणाम दिसला आणि फेसबुचा शेअर 20 टक्क्यांनी आपटला. अवघ्या दोन तासांमध्ये 125 अब्ज डॉलर्सची हवा झाली यामध्ये मार्क झकरबर्गचे 16.8 अब्ज डॉलर्सही आले. माहितीसंदर्भात विविध देशांमध्ये बदलत असलेले कायदे, श्रीलंका व म्यानमारमध्ये चुकीची माहिती पसरवली गेली व त्यामुळे झालेले दंगे, घटणारे किंवा अपेक्षेइतके न वाढणारे युजर्स या सगळ्यांची पार्श्वभूमी फेसबुकच्या आपटीला आहे.

फेसबुकचे सध्याचे जगभरातील अॅक्टिव किंवा सक्रिय असलेले मासिक युजर्स 2.23 अब्ज डॉलर्सच्या घरात आहेत. आणि ही संख्या कायम वाढत राहणं शक्य नाही हे देखील या निमित्तानं समोर आलं आहे. फेसबुकच्या रोजच्या अॅक्टिव्ह युजर्सची संख्या जूनमध्ये 1.47 अब्ज असून ती ही स्थिर असल्याचे किंबहुना अपेक्षेपेक्षा थोडी कमीच असल्याचे समोर आले आहे. यामुळे फेसबुक आता यापेक्षा वाढणार नाही की काय अशी चिंता गुंतवणूकदारांना लागली असून त्यामुळेच फेसबुकला शेअर्सच्या विक्रीचा तडाखा बसला आणि अन्यांसोबतच मार्क झकरबर्गच्याही 16.8 अब्ज डॉलर्सची राख झाली.