मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका वापरण्याचे आव्हान

२०१९ च्या लोकसभा निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या ऐवजी मतपत्रिकांच्या मदतीने घेतल्यास भाजपचा पराभव होईल, असे आव्हान बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी दिले आहे. बहुजन समाज पक्षाचा उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांत दुसरा क्रमांक आल्यानंतर मायावती यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने या निवडणुकीत महापौरांच्या १६ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. उरलेल्या जागा बसपाला मिळाल्या.

मायावती यांनी सांगितले की, आपल्या बाजूने बहुमत आहे असे भाजपला वाटत असेल तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बाजूला ठेवून मतपत्रिकांच्या पद्धतीने निवडणुका घ्याव्यात. तसे केले तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येणार नाही याची मला खात्री आहे.

बौद्ध भिख्खू भदंत प्रज्ञानंद यांना श्रद्घांजली अर्पण केल्यानंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. डॉ. आंबेडकरांना १९५६ मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा देणाऱ्या सात भिख्खूंमध्ये प्रज्ञानंद यांचा समावेश होता. त्यांचे लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत निधन झाले.

मायावती म्हणाल्या की, आम्ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्षचिन्हावर लढवल्या. त्यात दलित, मागास, उच्च जातीचे लोक, अल्पसंख्याक यांनी आम्हाला मोठय़ा संख्येने मते दिली. या निवडणुकांत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. अन्यथा आमचे जास्त उमेदवार महापौरपदी निवडून आले असते व जास्त जागाही जिंकल्या असत्या. इतर राजकीय पक्षांबरोबर युतीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, बसपाला दलित, आदिवासी, मागास,अल्पसंख्याक, उच्चजातीचे लोक यांची सर्व समाज आघाडी हवी आहे. त्यापेक्षा दुसरी मोठी आघाडी कुठली असू शकते.

‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका वापरल्या तर भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही याची मला खात्री आहे. उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला.’    – मायावती, बसपा पक्षप्रमुख