बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी राज्यसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. रालोआ सरकारच्या काळात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आपल्याला राज्यसभेत बोलून दिले जात नसल्याचा आरोप मायावतींनी आज सकाळी केला होता. उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा मायावती राज्यसभेत उपस्थित करु पाहत होत्या. मात्र, त्यांच्या मनानुसार त्यांना बोलण्यासाठी संधी दिली गेली नाही. भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. मला सभागृहात बोलू दिलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन असा इशारा मायावतींनी दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपचे खासदार काही केल्या ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे मायावती सभात्याग केला होता. त्यानंतर आज संध्याकाळी त्यांनी खरोखरच राज्यसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

राज्यसभा सभापतींच्या कार्यालयात राजीनामा देण्यासाठी जात असताना मायावती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला, खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी सभापतींचं कार्यालय गाठून मायावती यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम राहत मायावती यांनी सभापतींकडे राजीनामा सुपुर्द केला. राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन यांनी यांनी मायावतींची भाषणाची तीन मिनिटांची वेळ संपल्यानंतर त्यांना खाली बसण्यास सांगितले. तुम्ही सभागृहात एकाधिकारशाही गाजवू शकत नाही, असे कुरियन यांनी त्यांना सुनावले. त्यावरून मायावती प्रचंड नाराज झाल्या. सत्ताधारी पक्ष सभागृहात मला सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलून देत नसेल तर मी राज्यसभेचा राजीनामा देणेच चांगले आहे, अशी प्रतिक्रिया मायावती यांनी उपराष्ट्रपतींना राजीनामा पाठवल्यानंतर दिली.