जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीचा निषेध करण्यासाठी येत्या १९ तारखेला काळा दिवस साजरा करण्याचा ठराव पाकिस्तानी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आल्याबद्दल भारताकडून शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली . हा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून निवदेन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात भारताकडून पाकिस्तानी मंत्रिमंडळाचा ठराव पूर्णपणे फेटाळून लावण्यात आला आहे. पाकिस्तानकडून वारंवार आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला जाणे ही चितेंची बाब आहे. पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही परकीय घटकांचे आमच्या अंतर्गत बाबींशी देणेघेणे नसल्याचे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत. पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवाद्यांचे केले जाणारे उदात्तीकरण त्यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट करते. पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत राजकीय फायद्यापोटी केलेल्या कृती भारतातील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आहेत. पाकिस्तानमधील काही घटकांकडून जम्मू-काश्मीरमधील जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा प्रभाव असलेल्या भागात राजकीय फायदा मिळविण्यासाठी हे सगळे सुरू आहे. मात्र, हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला फटकारले 

दरम्यान, पाकिस्तान यापुढे आमच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसणार नाही आणि दक्षिण आशियात अशांतता निर्माण करणाऱ्या दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणार नाही, अशी आशा आम्ही करतो, असेही या निवेदनात म्हटले आहे.
काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये येत्या १९ तारखेला काळा दिवस साजरा करण्यात येणार आहे. पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संसदेमधील विशेष बैठकीत शुक्रवारी निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. काश्मीरवासियांच्या स्वतंत्र लढाईसाठी पाकिस्तान राजकीय आणि नैतिकतेतून समर्थन करेल, असे आश्वासन पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिले आहे.
भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये ‘दहशतवाद आयाती’ची अडचण