मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची केंद्राकडे मागणी

काश्मीरमधील हिंसाचार आटोक्यात आणून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तेथील जनतेशी संवाद साधण्याची गरज जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली. मुफ्ती यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन काश्मीरमधील स्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. जम्मू-काश्मीरमधील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याची मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू करायला हवी. तात्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरच्या जनतेची मने जिंकण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना पुन्हा हाती घ्यायला हव्यात, असे मुफ्ती यांनी सांगितले. काश्मिरी जनतेशी संवाद साधला तर जम्मू-काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवादसेतू बनू शकेल, असा विश्वास मुफ्ती यांनी व्यक्त केला.

मृतांची संख्या ५५ वर

काश्मीरमध्ये गेल्या शुक्रवारच्या चकमकीत जखमी झालेला एक जण ठार झाल्याने चकमकीतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या ५५ झाली आहे. हिजबुलचा दहशतवादी बुरहान वानी हा सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये निदर्शक व सुरक्षा दले यांच्यात चकमकी सुरू आहेत. काश्मीरमधील शोपियान जिल्ह्य़ात शुक्रवारी आमीर बशीर लोन हा जखमी झाला होता. त्याचा एसकेआयएमएस रुग्णालयात सकाळी मृत्यू झाला.

संचारबंदी कायम

श्रीनगरमध्ये सलग ३१व्या दिवशी संचारबंदी लागू आहे. श्रीनगरच्या नौहाटा खनायर, रैनावारी, सफाकदल, महाराजगंज व बाटमालू भागात संचारबंदी कायम आहे. बदगाम जिल्ह्य़ातील चांदुरा, खानसाहिब व अनंतनाग शहरात संचारबंदी लागू होती. खोऱ्यात प्रतिबंधात्मक जमावबंदी आदेश सर्वत्र लागू आहेत. बारामुल्ला जिल्ह्य़ात सोपोर येथे कायदा व सुव्यवस्थेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते पण पोलिसांनी त्याचा इन्कार केला. लागोपाठ ३१व्या दिवशी जनजीवन विस्कळीत होते. शाळा, महाविद्यालये, आस्थापने बंद होती, कार्यालये व बँकातील उपस्थिती कमी होती. मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. फुटीरतावाद्यांनी बंदचा कालावधी आता १२ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.