ब्रिटनमधील संशोधनात दावा

समाजमाध्यमांवर विशेष करून व्हॉट्सअ‍ॅपवर जे लोक जास्त वेळ घालवतात त्यांना एकटेपणा कमी जाणवतो व त्यांचा आत्मसन्मान वाढतो असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे.

ब्रिटनमधील एज हिल विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, जी उपयोजने (अ‍ॅप) गद्य संदेशावर आधारित आहेत त्यांचा मानसिक अवस्थेवर चांगला परिणाम होतो. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक जितका जास्त वेळ घालवतात तितके त्यांना मित्र व कुटुंबासमवेत असल्यासारखे वाटते त्यांना ते आभासी नातेसंबंध चांगल्या दर्जाचे वाटतात, असे डॉ. लिंडा के यांनी म्हटले आहे .

यातील व्हॉट्सअ‍ॅप समूहात लोक नाते व मैत्रीत  बांधले जातात. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान व सामाजिक सक्षमता वाढते. चोवीस वर्षे  वयोगटातील १५८ महिला व ४१ पुरुष यांचा अभ्यास यात करण्यात आला. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ह्य़ूमन कॉम्प्युटर स्टडीज या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. साधारणपणे यातील लोक रोज पंचावन्न मिनिटे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत होते, व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता व त्यातील गप्पांची सोय यामुळे त्याचा वापर एकूणच समाजात जास्त आहे. व्हॉट्सअ‍ॅप समूहात नाव जोडलेले असणे व त्यावर सतत सक्रियता यामुळे संबंधितांना एकटे वाटत नाही. ते सतत निकटच्या मित्रांशी आभासी पद्धतीने जोडलेले राहतात.

सकारात्मक निष्कर्ष

समाजमाध्यमांच्या वापराबाबत नकारात्मक निष्कर्ष असलेली संशोधनेच जास्त सामोरी येत असताना हे काहीसे सकारात्मक निष्कर्ष असलेले संशोधन आहे. समाजमाध्यमांची मानवी जीवनातील सकारात्मक भूमिका यात पुराव्यानिशी प्रतिपादन करण्यात आली असून दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर समाजातील घटकांना पाठिंब्यासाठी करता येतो हेच यात दाखवून देण्यात आले आहे, असे लिंडा यांनी म्हटले आहे.