इंटरनेट वापरायचे असेल, तर आपण बहुधा ‘इंटरनेट एक्प्लोरर’ या वेब ब्राउजरचा उपयोग करतो. ‘मायक्रोसॉफ्ट’ची निर्मिती असलेल्या या ब्राउजरचा भारतात मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जातो. ‘इंटरनेट एक्प्लोरर ७’च्या यशानंतर मोयक्रोसॉफ्टने ‘इंटरनेट एक्प्लोरर ८’ची निर्मिती केली आणि या ब्राउजरलाही मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र भारतात ‘इंटरनेट एक्प्लोरर ८’ वापरणे खूपच धोकादायक आहे, असा इशारा सायबर सुरक्षा यंत्रणेने दिला आहे. या ब्राउजरमधून मोठय़ा प्रमाणात व्हायरस सक्रिय होत असल्याची माहिती सायबर सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.
भारतातील सायबर सुरक्षेची धुरा ‘भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथका’कडे (सीईआरटी-इंडिया) आहे. ही यंत्रणा सायबर धोके, हॅकिंग यांचे निवारण करते. ‘इंटरनेट एक्प्लोरर ८’मध्ये मोठय़ा प्रमाणात व्हायरस असून, त्यामुळे तुमची खासगी संगणक यंत्रणा असुरक्षित होऊ शकते, अशी भीती या यंत्रणेने व्यक्त केली आहे. हा व्हायरस ‘उच्च’ तीव्रतेचा असल्याचे या यंत्रणेने सांगितले.
संगणकामध्ये असलेली वुल्नेराबिलिटी ही सिस्टीम संगणकीय प्रणाली दुर्बल करून हॅकरला हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करते. ‘इंटरनेट एक्प्लोरर ८’मध्ये या प्रणालीमुळे आणि ‘सीमार्कअप’च्या चुकीच्या पद्धतीमुळे सायबर हल्लेखोर सहज हल्ला करू शकतो, ज्यामुळे संगणकामधील मेमरी आणि एचटीएमएल पद्धत खराब होऊ शकते, अशी माहिती सायबर सुरक्षा यंत्रणेने दिली. इंटरनेट वापरकर्त्यांनी ‘इंटरनेट एक्प्लोरर ११’ डाऊनलोड केल्यास हा धोका राहणार नाही, अशीही माहिती या यंत्रणेकडून देण्यात आली आहे.