सध्या एका गोष्टीचं कौतुक सोशल मीडियावर काही प्रमाणात होतंय. ते म्हणजे मुंबईतले तीन महत्त्वाचे पूल विक्रमी वेळेत लष्कर बांधतंय या गोष्टीचं. सारासार विवेक हरवला की काय होतं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अत्यंत अकार्यक्षम आणि बेजबाबदार अशा रेल्वेच्या पापांना कार्यक्षम अशा लष्कराच्या कार्यानं झाकण्याचा हा कार्यक्रम… वास्तविक जगात सगळ्यात जास्त कर्मचारी (सुमारे 13.31 लाख कर्मचारी) या निकषात जगात आठव्या स्थानावर असणारी संस्था म्हणून बडेजाव मिरवणाऱ्या भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सर्व राजकीय नेतेमंडळींना शरमेनं खाली मान घालायला लागेल अशी ही घटना आहे. लष्कराचं काम भारतीय सीमांचं रक्षण करणं आणि अंतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून देशाचं रक्षण करणं हे आहे. अपवादात्मक स्थिती म्हणून लेह किंवा तत्सम अत्यंत दुर्गम ठिकाणी रस्ते बांधणी वा पूल उभारणीसारखी कामंही लष्करानं करणं समजण्यासारखं आहे, कारण तिथं ही कामं करणं येरागबाळ्याचं काम नाही, निसर्गाशी अक्षरश: युद्ध करूनच ही बांधकामं तिथं होत असतात.

परंतु ज्या मुंबईमधले रेल्वेचे बहुतांशी पूल शंभर दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधले, त्याठिकाणी पूल बांधण्यासाठी जर आपल्याला लष्कराला पाचारण करायला लागत असेल तर हा नक्कीच सिस्टमिक एररचा किंवा यंत्रणाच मूळात चुकीची असल्याचा प्रकार आहे आणि त्यामध्ये अभिमान वाटण्यासारखं काही नसून शरमेनं मान खाली जायला हवी.

भारतीय रेल्वे इतकी अवाढव्य आहे आणि तिच्यामध्ये सुधारणा करायला इतका वाव आहे की फक्त भारतीय रेल्वेचा उद्धार देशाचा जीडीपी वाढवू शकतो! हे मी नाही, माननीय पंतप्रधानांनीच निवडणुकीच्या काळातल्या भाषणांमध्ये सांगितलं होतं. देशाचा जीडीपी वाढवणं दूर राहिलं रेल्वेला स्वत:चं घर सांभाळता येत नाहीये ही स्थिती आहे. त्यातही वैशिष्ट्याचा भाग म्हणजे तथाकथित कार्यक्षम मंत्री सुरेश प्रभू व आताचे पियूष गोयल मुंबईचेच.
यातला दुसरा भाग म्हणजे, केवळ लष्कर किंवा पोलिसांसारख्या यंत्रणा नाही म्हणू शकत नाही, संप करू शकत नाही, म्हणून त्यांना असं लोककल्याणाच्या नावाखाली राजकर्त्यांनी मनाला येईल तिथं जुंपणंही धोकादायक आहे. आज जसे पोलिस त्यांचं मुख्य काम बाजुला ठेवून व्हीव्हीआयपींची सुरक्षाच करत बसतात, त्याप्रमाणे कदाचित उद्या असंही होऊ शकतं, की सीमेवर जवानांची कमतरता भासेल कारण, आपले जवान कुठे पूल बांधतायत, कुठे रस्ते बांधतायत तर कुठे पाण्याच्या पाइपलाइन्स टाकतायत. तुटपुंजा का असेना पण आहे तो पगार वेळेत व्हावा, म्हणून उद्या समजा शिक्षकांनी संप पुकारला तर काय जाणो आपले राजकारणी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या मागणीसाठी लष्कराला शाळांमध्ये शिक्षकांच्या कामाला जुंपतील आणि आपले बिचारे जवान शत्रूनं एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करावा कारण अहिंसा परमो धर्म सारखे धडे विद्यार्थ्यांना शिकवत बसतील.

आणिबाणीची स्थिती असणं वेगळं आणि नित्याचा रहाटगाडा ओढणं वेगळं. उत्तराखंडमधली आपत्ती असो, लातूर वा भूजसारखे भूकंप असो अशा अनपेक्षित नैसर्गिक कोपावर मात करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम अशा लष्कराची मदत घेणं आवश्यकच आहे. परंतु, रेल्वेसारखी बेजबाबदार संस्था आपलं काम चोख करत नसेल आणि त्यापोटी दुर्घटना घडून चेंगराचेंगरीत 22 लोक बळी पडत असतील तर अशावेळी पूल बांधण्यासाठी लष्कराला पाचारण करून रेल्वेच्या पापांवर पांघरूण घालण्यासारखं निंदनीय कृत्य असू शकत नाही. म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं काळ सोकावता कामा नये!