पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. काही ठराविकच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. परंतु यापूर्वीच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून पंतप्रधानांवर टीका केली आहे. “पंतप्रधानांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील आहे,” असं मत ओवेसी यांनी व्यक्त केलं.

“पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे संविधानाच्या शपथेच्या विरोधातील आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे. अयोध्येत ४०० वर्षांपर्यंत बाबरी मशीद उभी होती. परंतु काही गुन्हेगारांच्या गटानं १९९२ मध्ये ती पाडली हे आम्ही विसरणार नाही,” असं ओवेसी म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून याप्रकरणी टीका केली.

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम घरातूनच पाहता येणार

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजन : ८०० किलोमीटरचा प्रवास करुन मुस्लीम भाविक राहणार सोहळ्याला उपस्थित

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. ते सकाळी साडे अकरा वाजता या ठिकाणी पोहोचतील. त्यानंतर ते सर्वांना संबोधित करणार आहे. या कार्यक्रमात जवळपास निमंत्रितांसह २०० जण सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांची यादीही पंतप्रधान कार्यालयाला सोपवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा- अयोध्या राम मंदिराबाबतचं ‘ते’ वृत्त चुकीचं, विश्वस्त मंडळाने केलं स्पष्ट

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाविषयी ट्विट केलं होतं. “पंतप्रधान नरेंद्र ज्या दिवशी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत असतील, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून केलं जाणार आहे. त्याचबरोबर इतर वाहिन्याही कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणार आहेत,” असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं म्हटलं होतं. यापूर्वी अयोध्येतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.