काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून शिवसेनेला सूचक इशारा दिल्याचे दिसत आहे. या विधेयकास शिवसेनेकडून लोकसभेत पाठिंबा देण्यात आला होता. त्यानंतर हे विधेयक आज गृहमंत्री शाह यांनी राज्यसभेत सादर केले असून, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मतदान करतेवेळी शिवसेनेने नेमकं काय लक्षात ठेवावं हे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

आपल्या देशाचा कारभार हा राज्यघटनेनुसार चालतो आणि राज्यघटना ही समानतेच्या सिद्धांतावर आधारीत आहे. आम्ही आशा करतो की राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर मतदान करते वेळी शिवसेना हे बाब लक्षात ठेवेन, असा सूचक इशारा महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला दिला आहे.

शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करताच काँग्रेसमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या विधेयकाला पाठिंबा देणारे देशाचा पाया उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती, तर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी देखील शिवसेनेच्या भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर ‘पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवरील स्पष्टीकरणाशिवाय राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार नाही,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेने सर्वात आधी विरोध दर्शवला होता. भाजपशी काडीमोड घेतल्याने शिवसेना विरोधात मतदान करेल किंवा तटस्थ राहील, अशी शक्यता होती. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना तडजोड करणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या खासदारांनी व्यक्त केली. पण, शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा दिल्याने काँग्रेसमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा देऊन शिवसेनेने महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन करून भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी केला. ‘सेनेने विरोधात मतदान करणे वा तटस्थ राहणे अपेक्षित होते. विधेयकाच्या बाजूने मतदान करून शिवसेनेने काँग्रेसची फसवणूक केली’, अशी टीका काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केली होती.

त्यानंतर आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज हे विधेयक राज्यभेत मांडले गेले असताना, शिवसेनेनं राज्यसभेत आपली भूमिका मांडली. तुम्ही ज्या शाळेत शिकलात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत, असं म्हणतं शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसंच मानवतेच्या दृष्टीकोनातून या विधेयकावर चर्चा झाली पाहिजे. यावर व्होटबँकेचं राजकारण करू नये, असंही ते यावेळी म्हणाले. आता या विधेयकावरील मतदानावेळी शिवसेना नेमकी काय भूमिका घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.