अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. “क्षेपणास्त्र हल्ला ही फक्त अमेरिकेला लगावलेली एक चपराक आहे. बदला अजून पूर्ण झालेला नाही. बदला दुसराच काही तरी असणार आहे” असे खामेनी यांनी म्हटले आहे.
“आपल्याला अधिक मजबूत होण्याची गरज आहे. आपण अधिक मजबूत झालो तर, शत्रू आपले नुकसान करु शकणार नाही. अमेरिका आपल्याबरोबर असलेली वैरभावना कधीच संपवणार नाही” असे वक्तव्य खामेनी यांनी केल्याचे इराणीयन प्रसारमाध्यांनी म्हटले आहे. अमेरिकन्स खोटारडे असून, त्यांनी जनरल कासिम सुलेमानी यांना दहशतवादी ठरवल्याचे खामेनी म्हणाले.
आणखी वाचा – इराण बरोबर युद्धाची इच्छा नाही पण…
“आपण आपल्या शत्रूला ओळखले पाहिजे. त्याच्या योजना, पद्धत जाणून घेतली पाहिजे. राजकीय आणि लष्करी दृष्टया त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे लोक आहेत. अमेरिका आपला शत्रू आहे. काल रात्री आपण त्यांन चपराक लगावली. या भागातील अमेरिकेचा अपवित्र वावर संपला पाहिजे. अमेरिकेमुळे या प्रदेशाचे नुकसान झाले आहे. ते चर्चा करण्याबद्दल बोलतात पण त्यांना हस्तक्षेप करायचा आहे. हे कुठेतरी संपले पाहिजे” असे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संदेशात म्हणाले.
आणखी वाचा – अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यात ८० जण ठार, इराणचा दावा
हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यात ८० जण ठार ?
इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून या हल्ल्यात ८० जण मारले गेले असल्याचा दावा केला आहे. इराणमधील इंग्लिश न्यूज चॅनेल प्रेस टीव्हीने यासंबंधी ट्विट केलं आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ८० जण मारले गेले आहेत. जर न्यूज चॅनेलने केलेल्या दाव्यात तथ्य असेल तर अमेरिकेसोबतची लढाई अजून गंभीर स्वरुप धारण करु शकते.