बिहारमधील दुसऱ्या टप्प्यातील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्दय़ावरून नितीशकुमार यांना पाच वर्षांपूर्वीच्या टिप्पणीवर प्रत्युत्तर दिले. ‘सक्रिय राजकारणातील काही लोक राममंदिर कधी बांधले जाणार याची तारीख विचारत होते, त्यांना आता टाळ्या वाजवून स्वागत करावे लागत आहे. हीच भाजपची आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ओळख आहे. आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो’, असे दरभंगा येथे बुधवारी झालेल्या सभेत मोदी म्हणाले.

मोदींचे हे विधान प्रचारातील हिंदुत्वाच्या मुद्दय़ाचा उल्लेख असला तरी, जनता दलाचे(सं) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या २०१५ मधील मोदींविरोधी प्रचाराला दिलेले चपखल उत्तर मानले जात आहे. बिहारमध्ये भाजप व जनता दल यांची आघाडी एकत्रित विधानसभेची निवडणूक लढत असली तरी दोन्ही पक्षांतील अंतर्गत मतभेदही यानिमित्ताने दिसू लागले आहेत. बिहारमध्ये भाजपच्या जाहिरातींमध्ये नितीशकुमार यांना स्थान दिलेले नव्हते. हा नवा वादाचा मुद्दा बनल्यानंतर नितीश यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला.

२०१५मध्ये जनता दलाने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून भाजपच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी नितीशकुमार यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राम मंदिराच्या मुद्दय़ावरून डिवचले होते. ‘भाजप व संघाची मंडळी म्हणतात की रामलल्ला आम्ही येऊ, मंदिर तिथेच बनवू; पण तारीख मात्र सांगत नाहीत’, अशी टिप्पणी नितीशकुमार यांनी केली होती.

‘जंगलराज’चे युवराज

पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटणा अशा तीन प्रचारसभा घेतल्या. मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा उल्लेख ‘जंगलराजचे युवराज’ असा करत विकासविरोधी, भ्रष्टाचाराने माखलेले दिवस पुन्हा बिहारमध्ये आणू नका, असे आवाहन मतदारांना केले.

लालूप्रसाद यांचे राज्य करोनाच्या काळात असते तर करोना लढय़ासाठी दिलेल्या निधीचे काय झाले असते याची कल्पना तुम्ही करू शकता, असे मोदी म्हणाले. नितीशकुमार हेच भावी मुख्यमंत्री असतील, याचाही मोदींनी पुनरुच्चार केला.

खोटे बोलण्यात मोदींशी स्पर्धा नाही – काँग्रेस</strong>

काँग्रेसने देशाला दिशा दिली. रोजगार हमी योजना (मनरेगा) दिली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. आम्हाला देश कसा चालवायचा ते कळते, शेतकऱ्यांच्या सोबत कसे राहायचे, रोजगार कसा निर्माण करायचा हेही समजते पण, एक गोष्ट आम्हाला कधीच करता आलेली नाही ते म्हणजे खोटे बोलणे. खोटे बोलण्यात मोदींशी स्पर्धा करू शकत नाही, अशी उपहासात्मक टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी बिहारमधील प्रचारसभांमध्ये केली.

पहिल्या टप्प्यात ५३.४६ टक्के मतदान

* बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी ५३.४६ टक्के मतदान झाले. करोना आपत्तीच्या काळात होणारी ही पहिलीच निवडणूक असून नियमांचे पालन करून ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानात सहभाग घेतल्याचीही माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

* बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार असून बुधवारी १६ जिल्ह्य़ांतील ७१ मतदारसंघांत शांततेत मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात १,०६६ उमेदवार िरगणात उतरले होते. पुढील दोन टप्प्यांतील मतदान अनुक्रमे ३ व ७ नोव्हेंबर रोजी होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल असेल. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभेसाठी ५४.९४ टक्के, तर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ५३.५४ टक्के मतदान झाले होते.