प्रियंका गांधी-वढेरा यांची टीका

भारतातील लशी या लोकांचे जीव वाचवण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वैयक्तिक प्रसिद्धीचे’ माध्यम ठरल्या आहेत, अशा शब्दांत कोविड प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी बुधवारी केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर टाकली असल्याचा आरोप करतानाच, लसीकरण प्रमाणपत्रावर आता केवळ पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र असून, उर्वरित जबाबदारी मात्र राज्यांवर टाकली गेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

महासाथीच्या सुरुवातीपासूनच ही परिस्थिती असल्याचे पक्षाच्या सरचिटणीस असलेल्या प्रियंका यांनी फेसबुक व ट्विटरवर लिहिले. मोदी सरकारने देशाला लसटंचाईच्या ‘दलदलीत’ ढकलले असून लशींचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारताला इतर देशांकडून मिळणाऱ्या लशींवर अवलंबून राहण्याची वेळ आणली आहे, असाही आरोप त्यांनी केला.

‘आज लशींच्या तुटवड्याबाबत राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारला संदेश पाठवत आहेत,’ असेही हिंदीत केलेल्या ट्वीटमध्ये प्रियंका यांनी म्हटले आहे.