भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सध्या मोदी आणि केंद्र सरकार यांच्या प्रत्येक निर्णयाचे आणि विधानाचे खंडन करण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर मनसोक्त आसूड ओढल्यानंतर आता शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भावनिक आवाहनावर उपरोधिकपणे टीका केली आहे.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या जीवाला ज्याप्रमाणे दहशतवाद्यांकडून धोका होता, तसा कोणताही धोका नरेंद्र मोदी यांच्या जीवाला नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पणजी येथे केलेल्या भाषणात विरोधी शक्ती माझ्या जीवावर उठल्याचा दावा केला होता. या शक्ती कदाचित मला संपवतील, असेही मोदींनी म्हटले होते. मात्र, मोदींना दहशतवाद्यांकडून तसा कोणताही धोका नाही, असे सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे. या अग्रलेखातून मोदींच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यात आली असली तरी अग्रलेखाचा एकुणच सूर हा टीकेचा आहे.

पणजी येथील भाषणादरम्यान नरेंद्र मोदी काहीसे भावूक झाले होते. आपण देशासाठी आपले घर, परिवार, गाव या सगळ्याचा परित्याग केला असल्याचे स्पष्ट केले. माझा जन्म खुर्चीसाठी झाला नसल्याचे सांगतानाच काही चुकीचे करत असल्यास आपल्याला भर चौकात फाशी द्यावी, असे भावनिक उद्गार मोदींनी काढले होते. मात्र, पंतप्रधानांनी स्वत:ला शिक्षा करून घेण्याची अजिबात गरज नाही. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा देशातील १२५ कोटी जनता भोगत आहे तेवढी पुरेशी आहे. राष्ट्रभक्तीची शिक्षा फक्त जनताच भोगत असते व देशासाठी त्यागही फक्त जनताच करीत असते, असा उपरोधिक टोला सेनेकडून मोदींना लगावण्यात आला आहे.

‘भाषणादरम्यान भावूक होणे ही तर मोदींची नौटंकी’

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या जीवाची काळजी करू नये. मोदींना आणखी शंभर वर्षे ठणठणीत आरोग्याचे आयुष्य लाभो, अशी आम्ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. मोदी हे जगातील अभेद्य अशा सुरक्षा व्यवस्थेत आहेत व ही सुरक्षा व्यवस्था भेदून डासही त्यांना चावू शकत नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे. खलिस्तान्यांना खतम करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात सरळ सैन्य घुसवून देशद्रोह्यांशी युद्ध पुकारले. त्याची किंमत प्राणांचे मोल देऊन इंदिरा गांधी यांना चुकवावी लागली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी शीख सुरक्षा रक्षकांनीच त्यांना गोळ्या घातल्या. राजीव गांधींचा श्रीलंकेत शांती सैन्य पाठविण्याचा निर्णय वादग्रस्त असेलही, पण देशासाठी घेतलेल्या निर्णयाची किंमत राजीव गांधींना प्राणाचे मोल देऊनच चुकवावी लागली. मोदी यांनी फक्त नोटाच बदलल्या आहेत. नोटा बदलणे म्हणजे पाकिस्तानवर हल्ला नाही किंवा हाफीज सईदला फरफटत आणून दिल्लीच्या इंडिया गेटसमोर फासावर लटकवणे नाही. त्यामुळे सध्या तरी दहशतवाद्यांकडून कुणालाच भीती नाही, असे सेनेने म्हटले आहे.