नवी दिल्ली : पेगॅसस आणि शेती कायदे या प्रमुख दोन मुद्दय़ांवरून सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांचा गदारोळ कायम राहिला. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सातत्याने तहकूब झाले. शेतीच्या प्रश्नावरून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्रॅक्टर चालवत संसदेत येण्याचा प्रयत्न केल्याने संसदेच्या बाहेरही विरोधकांनी केंद्र सरकारवर दबाव वाढल्याचे दिसले. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ाची सुरुवातही वादळी झाली.

लोकसभेत काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर, मनीष तिवारी यांनी पेगॅसस मुद्दय़ावर स्थगन प्रस्ताव दिला होता, तर राज्यसभेत द्रमुकचे खासदार तिरूची शिवा यांनी पेगॅससवरील चच्रेसाठी अन्य कामकाज स्थगित करण्यासाठी २६७ अन्वये नोटीस दिली होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत विरोधकांची वरिष्ठ सभागृहातील रणनीती निश्चित करण्यात आली.

पेगॅससवर सत्ताधारी पक्षाने सभागृहात चर्चा केली पाहिजे; पण विरोधकांनी गोंधळ घातल्याचे कारण देत राज्यसभेचे कामकाज तहकूब केले जात आहे. पीठासीन अधिकारी कामकाज चालवण्याचाही प्रयत्न करत नाहीत, असे खरगे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, अनुराग ठाकूर यांची बैठक झाली. संसद अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात सातत्याने सभागृहे तहकूब झाल्यामुळे फारसे कामकाज झालेले नाही.

केंद्र सरकारने एकूण २९ विधेयके संमत करण्याची तयारी केली आहे. मात्र, सोमवारी राज्यसभेत तृणमूल काँग्रेस तसेच, काँग्रेसच्या सदस्यांनी सभापतींच्या समोरील हौदात उतरून घोषणाबाजी केल्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी तासाभरासाठी सभागृह तहकूब केले. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित झाले. दुपारच्या सत्रातही गोंधळ सुरू राहिल्याने राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब होऊन अखेर दिवसभरासाठी तहकूब केले गेले. दिवसेंदिवस राज्यसभेचे कामकाज चालवणे अशक्य होऊ लागले असल्याची भावना सभापती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. लोकसभेतही सातत्याने तहकुबी होऊन अखेर सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

राहुल गांधींचे ट्रॅक्टर आंदोलन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी ट्रॅक्टर आंदोलन केले. वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात निदर्शने करण्यासाठी राहुल गांधी संसदेपर्यंत ट्रॅक्टर चालवत आले. शेतकऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. सभागृहांमध्ये शेतीच्या मुद्दय़ांवर चर्चाही होऊ दिली जात नाही, असे राहुल गांधी म्हणाले.