दिल्लीतील सूरजकुंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयू) एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे ही तरूणी अत्यंत घाबरून गेली आहे. १४ ऑगस्टला ही विद्यार्थिनी आपल्या मित्र आणि मैत्रिणींसह दिल्लीतील असोला भागात असलेल्या भारतद्वाज तलावाजवळ फिरायला गेली होती. तेव्हा तेथील स्थानिक गुंडांनी आपल्याला जातीवाचक शिव्या दिल्या, छेड काढली आणि बलात्काराचा प्रयत्न केला असा आरोप या मुलीनं केला आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी ‘कोणतीही कायदेशीर कारवाई नको’ असं सक्तीनं लिहून घेतल्याचंही या मुलीनं म्हटलं आहे.

१४ ऑगस्टला रात्री ८.३० च्या दरम्यान पीडित मुलगी आणि तिचे मित्र-मैत्रिणी असोला येथून परतत होते, त्यावेळी काही स्थानिक गुंडांनी या सगळ्यांना अडवलं. त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली, एवढंच नाही तुम्ही समाजाला कलंक आहात म्हणत या सगळ्यांना शिव्याही दिल्या. ही मुलगी आपल्या मित्रासोबत बाईकवरून चालली होती. तर तिचे काही मित्र मैत्रिणी पायी येत होते. त्याचवेळी रस्त्यावर ८ ते ९ गुंडांनी दोन बाईकवर असलेल्या दोघांना अडवलं, बाईकची तोडफोड केली, आमच्या जवळ असलेली ओळखपत्रं फाडून टाकली आणि मोबाईलही तोडले, त्यानंतर या सगळ्या गुंडांनी आपल्याला खेचून एका शेडमध्ये नेलं. तिथे नेऊन बलात्काराची धमकी दिली. या सगळ्या प्रकारानंतर चालत येणाऱ्या पीडितेच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस आल्यानं हे सगळे गुंड पळून गेले.

सूरजकुंड पोलिस ठाण्यात या सगळ्यांची तक्रार   आली नाही. ज्यानंतर या सगळ्यांनी दिल्ली पोलीस ठाण्यात ‘झीरो एफआयआर’ नोंदवली. दिल्ली पोलिसांनी या एफआयआरची कॉपी सूरजकुंड आणि वसंत कुंज पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र चूक या मुलांचीच होती असं सूरजकुंड प्रभारी निरीक्षक पंकज यांनी म्हटलं आहे. ज्या तलावापाशी हे सगळे फिरायला गेले होते तिथे लुटमारीच्या घटना होतात असा बोर्ड लावण्यात आला होता, तरीही हे विद्यार्थी अशा ठिकाणी फिरायला गेले. रात्री ८.३० वाजेपर्यंत हे तिकडे थांबलेच का? असाही प्रश्न पंकज यांनी विचारला आहे.

दरम्यान पीडित मुलीला या सगळ्या प्रकाराचा अत्यंत धक्का बसला आहे. कारण पोलिसांनी आपल्या चारित्र्यावरही संशय घेतल्याचा आरोप या पीडित मुलीनं केला आहे. तसंच आपल्याला पोलिसांनीच उलटसुलट प्रश्न विचारले, असंही या मुलीनं म्हटलं आहे. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सखोलपणे करण्यात येतो आहे.

दिल्लीतल्या एका महिलेवर हैदराबादमध्ये बलात्कार

जेएनयूमधील एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच तिकडे हैदराबादमध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका २० वर्षांच्या एका महिलेवर ४० वर्षांच्या नराधमानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बंदुकीचा धाक दाखवून या नराधमानं या महिलेवर बलात्कार केला. बलात्कार करणाऱ्या या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय आणखी तिघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिलेनं केली आहे.