मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी मुथरेतील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर बोलताना भाजप खासदार हेमा मालिनी यांनी ऐतिहासिक संदर्भ दिला. ‘मथुरेत आता कृष्ण कमी आणि कंसच जास्त आहेत,’ असे हेमा मालिनी यांनी म्हटले. हेमा मालिनी यांनी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

‘मथुरेत गुन्हेगारीच्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतील, याचा मी कधीच विचार केला नव्हता. मथुरा ही भगवान कृष्णाची नगरी असल्याने मी येथे आले होते. येथीस कणाकणात कृष्णाचे वास्तव्य आहे. मात्र आता मथुरेत कृष्णापेक्षा कंसांची संख्या जास्त आहे. पूर्वी असे नव्हते,’ असे भाजप खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले. मथुरेतील सराफा बाजारात १५ मे रोजी दोन व्यापाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. यावेळी कोट्यवधींचा ऐवजदेखील लंपास करण्यात आला. हत्या करण्यात आलेल्या दोन व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांची हेमा मालिनी यांनी भेट घेतली. यावेळी हेमा मालिनी यांनी दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.

मथुरेतील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन हेमा मालिनी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. मथुरेतील व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी हेमा मालिनी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. ‘मी खासदार होण्यासोबतच एक स्त्रीदेखील आहे. त्यामुळेच या घटनेने मला दु:ख झाले आहे. या दुर्घटनेमुळे दोन्ही व्यापाऱ्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून मी पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहे,’ असे हेमा मालिनी यांनी सांगितले.

१५ मे रोजी हत्या आणि लुटीच्या घटना घडल्यानंतर पाच जखमी व्यापारी आणि कारागिरांना तातडीने उपचार मिळू शकले नाहीत. याबद्दल बोलताना, ‘मथुरेच्या रुग्णालयात डॉक्टरच नसतात, ही बाब लक्षात आली आहे,’ असे हेमा मालिनी यांनी म्हटले. ‘घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांनी त्यांना वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्याची माहिती दिली. रुग्णालयात पोहोचल्यावर तेथील आपत्कालीन विभागातील वीजपुरवठा खंडित झाला. यासाठी पर्यायी व्यवस्थादेखील उपस्थित नव्हती,’ असेदेखील हेमी मालिनी म्हणाल्या.