चीनप्रमाणे इराणलाही करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. इराणमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. इराणच्या वेगवेगळया प्रांतामध्ये तब्बल ६ हजार भारतीय अडकून पडल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, इराणच्या वेगवेगळया प्रांतांमध्ये तब्बल ६ हजार भारतीय अडकून पडले आहेत.

लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्रातील जवळपास ११०० यात्रेकरुंचा यामध्ये समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील ३०० विद्यार्थी तसेच केरळ, तामिळनाडू आणि गुजरातमधील १००० मच्छीमारांचा यामध्ये समावेश आहे. एस. जयशंकर यांनी आज लोकसभेमध्ये ही माहिती दिली.

या सर्वांना परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून, सर्वात आधी यात्रेकरुंकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. इराणमधील कोम या ठिकाणी करोना व्हायरची सर्वाधिक लागण झाली आहे अशी माहिती जयशंकर यांनी दिली. इराणवरुन आतापर्यंत ५२९ नमुने प्राप्त झाले असून त्यातील २९९ निगेटीव्ह आल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.

अमेरिकेत ३१ बळी, रुग्ण हजारावर
अमेरिकेत करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता ३१ झाली असून संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या हजारावर गेली आहे. देशाच्या तीस राज्यात विषाणूचा प्रसार झाला असून अनेक राज्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या आता १०३७ झाली असल्याची माहिती जॉन हॉपकिन्स केंद्राने दिली आहे.