मध्य प्रदेशच्या पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी त्यांच्या समर्थकांच्या मदतीने लूटमार केल्याचा आरोप केला जात आहे. वन मंत्री विजय शाह यांनी या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत. वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार तपासाचे आदेश देण्यात आले असून आजपासून या प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याचे समजते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राज्याच्या पर्यटन तसेच संस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष गटाची स्थापना करण्यात आलीय.

बडगोंदा पोलीस स्थानकामध्ये वन विभागाने एका अर्जाद्वारे ठाकूर आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यालयात घातलेल्या गोंधळाची माहिती दिली आहे. उषा ठाकूर आणि त्यांच्या समर्थकांनी वन विभागाच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातला. तसेच वन विभागाने अनधिकृतपणे खोदकाम केल्याप्रकरणी जप्त केलेला जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली हे समर्थक कार्यालयामधून कोणाचीही परवानगी न घेता जबरदस्तीने घेऊन गेल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. वनपाल असणाऱ्या राम दुबे यांनी हा अर्ज पोलिसांकडे केला आहे. या अर्जासोबत एक व्हिडीओही पोलिसांना देण्यात आला आहे. आडा पहाड परिसरामध्ये मागील आठवड्यात मोठ्याप्रमाणात बेकदायदेशीरपद्धतीने खोदकाम करुन खडी फोडली जात असल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणात वनविभागाने कारवाई केली होती.

आणखी वाचा- ‘गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे; साहित्य-पोस्टर्स केले जप्त

१० जानेवारी रोजी महू येथील वन खात्याच्या बडगौंदा बीटच्या कक्ष क्रमांक ६६ मध्ये बेकायदेशीरपणे खोदकाम सुरु असल्याचे स्पष्ट झालं. या ठिकाणी खोदकाम करुन काढण्यात आलेली खडी ही कोणाची परवानगी न घेता रस्ते बनवण्यासाठी वापरली जात होती. तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी एक जेसीबी, ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली. ही सर्व जप्त केलेली वाहने वन विभागाच्या कार्यालयासमोर आणून उभी करण्यात आली.

आणखी वाचा- महात्मा गांधींच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली; भाजपा नेत्याचं विधान

बडगौंदा पोलिसांकडे देण्यात आलेल्या अर्जामध्ये ११ जानेवारी रोजी वनरक्षक जौहर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री उषा ठाकूर, मनोज पाटीदार, सुनिल यादव, वीरेंद्र आंजना, अमित जोशी, सुनील पाटीदार, प्रदीप पाटीदार यांच्यासोबत १५ ते २० लोकांनी वन खात्याच्या कार्यालयामध्ये जबदस्तीने प्रवेश केला आणि जप्त केलेली वाहने आपल्यासोबत घेऊन गेले.  या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत मंत्री ठाकूर यांच्यासहीत सर्वांविरोधात कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे अर्जाद्वारे केली आहे.