ही राजकारणाची वेळ नाही. एकमेकांच्या हाताला धरून महाराष्ट्र व देश या संकटावर मात कसा करेल ती ही वेळ आहे त्यामुळे घरीच रहा. आजची देशसेवा हीच आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

“मी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच घरात इतका वेळ राहिले आहे. लॉकडाउन संपण्यासाठी ७ दिवस शिल्लक आहेत. लॉकडाऊन वाढवायचा की नाही तो निर्णय सरकार घेईल आणि तो तुमच्या माझ्या हिताचा असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे, अनिल देशमुख हे सातत्याने माध्यमांशी आणि जनतेशी संवाद साधून माहिती देत आहेत,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

“दिल्लीत ज्या घटना घडल्या याचं वाईट वाटते. दिल्लीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले त्यावेळी दंगल झाली. अशावेळी पोलीस आयुक्त काय करत होते. त्यानंतर मरकजची घटना झाली. त्याच पोलीस आयुक्तांनी त्यांना परवानगी दिली. प्रशासनाचे नक्की लक्ष आहे कुठे आणि प्रशासनाने दहा दिवसाच्या अंतरात या दोन गोष्टी होऊच कशा दिल्या,” असा सवाल त्यांनी यावेळी केला.

ही माणुसकीची वेळ
“हा विषय राजकीय नाही. कुणीही याचा गैरसमज करु नये. राजकारण करायची ही वेळ नाही. मलाही उलटेसुलटे मेसेज येतात, ते मी कधीच फॉरवर्ड करत नाही. कारण ही माणुसकीची वेळ आहे. कुणावरही टीका करायची वेळ नाही. आपल्याला एकमेकांचे हात धरुन जितकी आयुष्य वाचवता येतील, जितक्या लोकांना सेवा देता येईल याची ही वेळ आहे,” असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं,

राज्याकडून आर्थिक पॅकेजची मागणी
“जीएसटी बरोबर महाराष्ट्राला केंद्राकडून बराच निधी यायचा आहे. राज्यांना किंवा केंद्राला अडचणी आहेत परंतु महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. यावरही पंतप्रधान बोलतील. महाराष्ट्रात टास्कफोर्स स्थापन करण्याची विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सतत सर्वांच्या संपर्कात आहेत. ते बोलतात त्यावेळी सर्वांना आधार मिळतो. सरकारचं काम कसं सुरू आहे हे ही जनतेला समजतं आहे, असंही त्या म्हणाल्या.