मुंबईतील लोकलच्या मासिक आणि त्रैमासिक पासच्या भाडेवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मुंबईतील भाजप, शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी दिले.
रेल्वेने प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात केलेल्या वाढीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील खासदारांनी मंगळवारी सकाळी सदानंद गौडा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये प्रवासी भाड्यात करण्यात आलेल्या वाढीसोबतच मुंबईतील रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. येत्या अर्थसंकल्पात मुंबईकरांचे कोणते विषय प्राधान्याने सोडवण्यासाठी तरतूद करायला हवी, यावरही या बैठकीत चर्चा झाली. खासदार रामदास आठवले, किरीट सोमय्या, पूनम महाजन, राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, राजन विचारे यांच्यासह विनोद तावडे या बैठकीला उपस्थित होते.
भाडेवाढीसंदर्भात मुंबईकर प्रवाशांच्या भावना आम्ही रेल्वेमंत्र्यांपर्यत पोहोचविल्या. बैठकीत त्यावर चर्चा झाली आणि सदानंद गौडा यांनी या संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मागण्यांचा अभ्यास करून लवकरच घोषणा केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.