मुस्लिम युवा दहशतवाद विरोधी समितीने भारतीय लष्कराचा जो जवान पाकिस्तानी सैनिकाचे शिर आणेल त्याला पाच कोटी रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शकील सैफी यांनी ही घोषणा केली. या वेळी त्यांनी पाकिस्तानी लष्करावर हल्लाबोलही केला.

केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात सक्त कारवाई करण्याची आता वेळ आली आहे, असे सैफी यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी आमच्या दोन सैनिकांचे शिर कापण्याची घटना खूप गंभीर आहे. पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राइकसारख्या मोठ्या कारवाईची गरज आहे. गतवर्षी ज्या पद्धतीने आमच्या लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केले. तशीच कारवाई पाकिस्तानविरोधात झाली पाहिजे. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांचे शिर कापल्यामुळे देशातील नागरिकांत असंतोष आहे, असे ते म्हणाले.

 

देशवासियांच्या भावना पाहता समितीने एका पाकिस्तानी सैनिकाच्या मुंडक्याच्या बदल्यात पाच कोटी रूपये देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. समितीशी निगडीत मुस्लिम युवक भारतीय लष्करात दाखल होण्यास इच्छुक आहेत. सरकारने जर निर्णय घेतला तर मुस्लिम युवक सिमेवर जाऊन पाकिस्तानला जशास तसे उत्तर देईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड इच्छाशक्ती असलेले नेते आहेत. मोदींनी पाकिस्तानला असा धडा शिकवायला हवा की त्यांची पुन्हा भारताकडे पाहण्याची हिंमतही होऊ नये. देशाच्या अखंडतेसाठी सर्व लोकांचे एकमत आहे. सर्वचजण भारतमातेसाठी आपले प्राण देण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले.

अशाप्रसंगी राजकीय पक्षांनी स्वार्थ न पाहता एकतेचा परिचय द्यावा आणि पंतप्रधान मोदींचे समर्थन करत पाकिस्तान विरोधात कारवाई करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुस्लिम नेहमी देशाच्या रक्षणासाठी तयार आहेत. विषम परिस्थितीत देशाबरोबर ते कायम उभे असतात, असे ते म्हणाले.