आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजनासाठी भाजपा हैदराबादच्या एका पक्षाला पैसे देत आहे असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज उत्तर दिले. मुस्लिम मते ही ममता बॅनर्जींची जहागिरी नाही असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

“जे मुस्लिम विचार करतात आणि स्वत:साठी बोलतात, ते मुस्लिम ममता बॅनर्जींना आवडत नाहीत” असे असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. ममता बॅनर्जींचे आरोप खोडून काढताना ओवेसी म्हणाले की, ‘कोणीही मला पैशाने विकत घेऊ शकत नाही.’

बिहारनंतर ओवेसी यांचा एआयएमआयएम पक्ष आता पश्चिम बंगालची निवडणूक लढवणार आहे. तिथल्या काही मतदारसंघांमध्ये मुस्लिम मते निर्णायक आहेत. त्यामुळे या मतांवर ममता बॅनर्जी आणि असदुद्दीन ओवेसी दोघांचे लक्ष आहे.

“असदुद्दीन ओवेसीला पैशाने विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. ममता बॅनर्जी यांचे आरोप तथ्यहीन असून त्या अस्वस्थ आहेत. त्यांनी स्वत:च्या घराची चिंता करावी. त्यांच्या पक्षाचे अनेक लोक तृणमुल सोडून भाजपामध्ये चालले आहेत. त्यांनी बिहारच्या मतदारांचा आणि आम्हाला मतदान करणाऱ्यांचा अपमान केला आहे” असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

“जे मुस्लिम विचार करतात आणि स्वत:साठी बोलतात, ते मुस्लिम तुम्हाला आवडत नाहीत. तुम्ही बिहारमधल्या आमच्या मतदारांचा अपमान केला. बिहारमधल्या पक्षांबरोबर काय झाले ते लक्षात घ्या, ते त्यांच्या अपयशाचे खापर मत कापण्यावर टाकत आहेत. मुस्लिम मते ही तुमची जहागिरी नाही” अशा शब्दात ओवेसींनी ममता बॅनर्जी यांना उत्तर दिले आहे.