दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एक वर्षांच्या कालावधीत भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप केजरीवाल यांचे, ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनातील नेते एन. संतोष हेगडे यांनी केला आहे.
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्वात महत्त्वाचे होते, मात्र केजरीवाल यांनी त्यासाठी काहीही केले नाही, असेही संतोष हेगडे यांनी दिल्ली सरकारच्या एका वर्षांच्या कामगिरीबाबतच्या संदर्भाने स्पष्ट केले.
अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील कारभाराबाबत विशेषत: भ्रष्टाचार निपटून काढण्याबाबत आपण समाधानी नाही.
दिल्लीचे मुख्यमंत्री राजपथावर धरणे धरतात यावरून त्यांच्याकडे प्रशासकीय कामकाजाच्या अनुभवाचा अभाव असल्याचे स्पष्ट होते, असेही संतोष हेगडे यावेळी म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्यापही ते विरोधी पक्षात असल्याचेच वाटत आहे.
त्यामुळे प्रशासक म्हणून कामकाज करण्याऐवजी बाहेर आंदोलने करण्याच्याच ते सतत मन:स्थितीत आहेत, त्यांनी अधिक परिपक्वता दाखविणे गरजेचे आहे, असेही हेगडे म्हणाले.
आम आदमी पक्षाचे काही आमदार आणि मंत्री यांच्याविरुद्धच्या खटल्यांचा संदर्भ देऊन संतोष हेगडे म्हणाले की, केजरीवाल यांनी अशा व्यक्तींना उमेदवारी देण्यापूर्वी त्यांचा पूर्वेतिहास जाणून घ्यावयास हवा होता.