विटंबनेच्या वृत्तात तथ्य नसल्याचा, तसेच गुरुद्वाराचे नुकसान झाले नसल्याचा पाकिस्तानचा दावा

शीख पंथाचे संस्थापक गुरुनानक यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानच्या नानकाना साहिब शहरातील गुरुद्वारावर जमावाने शुक्रवारी केलेला हल्ला आणि तेथील भाविकांवर केलेली दगडफेक यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी जम्मू-काश्मीर व नवी दिल्लीत विविध संघटनांनी निदर्शने केली.

जम्मूत विविध शीख संघटना आणि शिवसेना डोग्रा फ्रंट यांनी शहराच्या निरनिराळ्या भागांत, तसेच पूंछ शहरात निदर्शने केली. पाकिस्तानविरोधी घोषणा देत त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमा जाळल्या. मात्र ही निदर्शने शांततेत झाली.

पाकिस्तानातील काही घटक शिखांसह इतर अल्पसंख्याकांना त्रास देऊ इच्छितात. या घटनेचा तात्काळ तपास झाल्यास दोषींवर कारवाई केली जाऊ शकते, असे सर्वपक्षीय शीख समन्वय समितीचे अध्यक्ष जगमोहन सिंग रैना यांनी एका निवेदनात सांगितले. कर्तारपूर मार्गिका खुली केल्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात काहीशी मित्रभावना निर्माण झालेली असतानाच गुरुद्वारावर झालेला हल्ला संशयास्पद असल्याचे ते म्हणाले.

भाजप व काँग्रेस यांच्या राज्य शाखांनीही या हल्ल्याचा निषेध केला.

नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देणाऱ्या काही कार्यकर्त्यांना चाणक्यपुरी पोलीस ठाण्यानजीक रोखण्यात आले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाकविरोधी घोषणा देत पाकिस्तानी दूतावासानजीक निदर्शने केली.

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती आणि शिरोमणी अकाली दल यांच्या सदस्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयानजीक निदर्शने केली. त्यांनी पाकिस्तान व इम्रान खान यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याचा निषेध केला. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असे सांगून, पाकिस्तानने दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. आमच्या पवित्र स्थळांवरील हल्ले आम्ही सहन करू शकत नाही, असे ते म्हणाले.

धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न : पाकिस्तानचा दावा

लाहोरमधील नानकाना साहिब गुरुद्वारावर एका जमावाने हल्ला करून त्याची विटंबना केल्याचे माध्यमांनी दिलेले वृत्त पाकिस्तानने फेटाळले आहे. या गुरुद्वाराचे काहीही नुकसान झालेले नसून, तो नष्ट झाल्याचा दावा खोटा असल्याचे त्या देशाने सांगितले. नानकाना साहिब शहरात शुक्रवारी मुस्लिमांच्या दोन गटांत चकमक झाली. एका चहाच्या टपरीवर ही किरकोळ घटना झाली आणि जिल्हा प्रसासनाने तात्काळ हस्तक्षेप करून आरोपींना अटक केल्याचे पंजाब प्रांताच्या अधिकाऱ्यांनी कळवले असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात सांगितले. या घटनेत गुरुद्वाराचे नुकसान झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. या घटनेला धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न हेतुपुरस्सर आहेत, असेही पाकिस्तानने सांगितले.

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे शिष्टमंडळ पाकिस्तानला जाणार

चंडीगड : गुरुद्वारा नानकाना साहिबवर जमावाने हल्ला केल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) चार सदस्यांचे शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठविण्याचे ठरविले आहे. नानकाना साहिबवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी एसजीपीसीचे प्रमुख गोविंदसिंग लोंगोवाल यांनी पाकिस्तान सरकारकडे केली आहे. इतकेच नव्हे तर तेथे वास्तव्याला असलेल्या शीख समाजाला संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याचे औचित्य सिद्ध- भाजप

नवी दिल्ली : नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्ल्याच्या घटनेमुळे, आपल्या शेजारच्या तीन देशांमधील अल्पसंख्याकांच्या संरक्षणांसाठी नागरिकत्व कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांचे औचित्य सिद्ध झाले असल्याचे भाजपने शनिवारी सांगितले. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना अनेक दशकांपासून धर्मातर, बलात्कार आणि हिंसाचार यांच्या धमक्या मिळत असून; तेथील अल्पसंख्यांकाचा कशारितीने धार्मिक छळ होतो आणि त्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याची आवश्यकता कां आहे हे या घटनेमुळे दिसून आले आहे, असे भाजपच्या नेत्या मीनाक्षी लेखी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आदींचे  डोळे या घटनेमुळे उघडायला हवेत, असे त्या म्हणाल्या.