‘एक नयी सुबह’मध्ये मोदी यांचे प्रतिपादन
एका हाताला आमचा विकासवाद आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा विरोधवाद आहे. यातील कशाची निवड करायची हे लोकांना चांगलेच समजते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्लीच्या इंडिया गेट येथे आयोजित सोहळ्यात शनिवारी केले.
‘एक नयी सुबह’ या सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. आमच्या सरकारच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे, पण ते आधीच्या सरकारच्या तुलनेतच झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. लोकशाहीत सरकारचे मूल्यमापन होणे योग्यच आहे, पण दिशाभूल करणारा प्रचार म्हणजे मूल्यमापन नव्हे. मागच्या सरकारला भ्रष्टाचाराची लागण झाली होती, हे कोणीही मान्य करील. माझ्या सरकारने मात्र भ्रष्टाचाराला लक्षणीय आळा घातला, असा दावाही त्यांनी केला.
लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवून सत्ता दिली. आम्हीही लोकांमधील विश्वास जागवला आणि वृद्धिंगत केला, असेही ते म्हणाले. सरकारच्या आगामी तीन वर्षांतील प्रस्तावित कामांची माहितीही त्यांनी दिली. कोळसा खाणींच्या वाटपात पारदर्शकता आणली, असे सांगताना त्यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने केलेले उपाय सांगितले.
गॅस सिलिंडर सवलतीतील गैरप्रकार रोखून १५ हजार कोटी रुपये वाचविले गेले, एक कोटी ६२ हजार खोटय़ा शिधापत्रिकांचा छडा लावला, असेही त्यांनी सांगितले. माझ्या आवाहनानंतर एक कोटी १३ लाख लोकांनी गॅस सबसिडी सोडून दिली, असेही ते म्हणाले.

‘पटेलां’ची उपस्थिती
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या कार्यक्रमास उपस्थित होत्याच, पण नितीनभाई पटेल यांची उपस्थितीही नजरेत भरणारी होती. आनंदीबेन यांच्या जागी नितीनभाई यांना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी आणले जाण्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनीही यावेळी भाषणे केली. पनामा पेपर्समध्ये नावे असलेल्या सर्वाची सखोल चौकशी होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. या सोहळ्यात अमिताभ बच्चन, विद्या बालन, रविना टंडन यांच्यासह अनेक सिताऱ्यांची उपस्थिती होती.

राहुल गांधींची टीका
महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ असताना सरकार चित्रपट ताऱ्यांबरोबर नाच-गाण्यांत दंग आहे, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हाणला. खोटय़ा आश्वासनांनी देशाची प्रगती होत नसल्याचेही ते म्हणाले.