तामिळनाडूतील सभेत काँग्रेसवर नाव न घेता टीका
दलितांसाठीचे आरक्षण कदापि रद्द होणार नाही, अशी ग्वाही देतानाच दलितप्रश्नी जाणीवपूर्वक अपप्रचाराची मोहीम राबविली जात आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे प्रचारसभेत केली. देशाचे ऐक्य धोक्यात आणण्याचा हा कट आहे, असा आरोपही त्यांनी केला.
तामिळनाडूच्या संभाव्य विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार भाजपने मोदी यांच्या या सभेपासून सुरू केला आहे. मात्र या सभेत स्थानिक मुद्दय़ांना किंचितही स्पर्श न करता मोदी यांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली. दलित, अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण मोदी रद्द करणार असल्याचा अपप्रचार काहीजण करीत आहेत, पण जोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अमर राहील तोवर आरक्षण रद्द होणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हैदराबाद दौऱ्यांनी भाजप नेत्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे या दौऱ्यात काँग्रेसचे नाव न घेता मोदी म्हणाले की, दलितांच्या भावनांना हात घालत ते जिथे जातील तिथे वावडय़ा उठवीत आहेत. उंच स्वरात अपप्रचार सुरू आहे. दलितांची दिशाभूल करण्याचा आणि त्यांना मूर्ख ठरवण्याचा हा डाव आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.
समाजात दुही माजावी आणि देशाचे ऐक्य मोडीत निघावे, असा त्यांचा कुटील हेतू आहे. सत्ता गमावल्याने वैफल्यग्रस्त झाल्याने ते असे उद्योग करीत आहेत, अशी टीकाही मोदी यांनी केली.
दलितांना ते आपले हक्काचे मतदार समजतात. आता मोदी त्यांच्यासाठी काम करीत आहेत. या मोदीचे काय करायचे, अशी भीती त्यांना वाटत आहे. मोदींना पाठिंबा देण्यापासून दलित समाजाला परावृत्त करण्यासाठी म्हणूनच ते अशी धडपड करीत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला.