पाश्चिमात्य पतमानांकन संस्थांना प्रत्युत्तर देण्यासाठी, तसेच विकसनशील देशांतील स्वायत्त आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी ब्रिक्स देशांची पतमानांकन संस्था (क्रेडिट रेटिंग एजन्सी) स्थापन करण्याच्या आवश्यकता असल्याचे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.

ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या ६ देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ च्या वेगळ्या रेटिंग एजन्सीमुळे  सदस्य राष्ट्रांच्या तसेच इतर विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांना मदत होईल, असे मोदी यांनी ब्रिक्स परिषदेच्या समारोप सत्रातील भाषणात सांगितले.

‘ब्रिक्स’ पतमानांकन संस्था स्थापन करण्याकरता प्रयत्न वाढवण्याबाबत आपण गेल्या वर्षी चर्चा केली होती. तज्ज्ञांचा एक गट अशा संस्थेच्या व्यवहार्यतेबद्दल तेव्हापासून अभ्यास करतो आहे.  या संस्थेच्या निर्मितीच्या आराखडय़ाला लवकरात लवकर अंतिम स्वरूप दिले जावे असे मी आवाहन करतो, असे मोदी म्हणाले. ब्रिक्स देशांनी परस्परांमध्ये आर्थिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या आवश्यकतेवरही मोदी यांनी भर दिला. आपल्या मध्यवर्ती बँकांनी आपल्या क्षमता बळकट करून, कॉन्टिन्जेंट रिझव्‍‌र्ह अरेंजमेंट आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.

‘ब्रिक्स’ परिषदेत मोदी-जिनपिंग भेट होणार, चीनचे संकेत

बीजिंग : ब्रिक्स परिषदेच्या पाश्र्वभूमीवर चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट होणार असल्याचे सोमवारी चीनने सूचित केले, मात्र डोकलाम प्रश्नावर चर्चा होणार का, याबाबत चीनने कानावर हात ठेवले आहेत. चीन या परिषदेचे यजमानपद भूषवीत असून सर्व सहभागी देशांच्या नेत्यांशी बैठक आयोजित केली जाईल, असे आपल्या सहकाऱ्यांनी सांगितल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. मोदी आणि क्षी जिनपिंग यांची भेट होणार का, या प्रश्नाला ते उत्तर देत होते. डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात अलीकडेच तिढा निर्माण झाला होता, त्यामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीत या प्रश्नावर चर्चा होणार का, असे विचारले असता गेंग यांनी या प्रश्नाला बगल दिली. भेटीचा सविस्तर तपशील लवकरच घोषित केला जाईल, असे ते म्हणाले.

मोदी- पुतिन भेटीत अनेक द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा

झियामेन  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय व्यापार व गुंतवणूक वाढवण्याच्या उपायांबाबत, तसेच अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक परिस्थितीबाबत चर्चा केली. ब्रिक्स परिषदेनिमित्त एकत्र आलेल्या या दोन नेत्यांनी या भेटीची संधी साधली. रविवारी सायंकाळी येथे येऊन पोहोचलेल्या मोदींची ही पहिली द्विपक्षीय बैठक होती. मंगळवारी म्यानमारला जाण्यापूर्वी मोदी हे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनाही भेटण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. अध्यक्ष पुतिन यांनी या वर्षीच्या सुरुवातीला मोदी यांच्या रशिया भेटीची आठवण काढली. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममधील भारताच्या सहभागाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. दोन नेत्यांची अफगाणिस्तानबाबत चर्चा झाली काय असे विचारले असता, अफगाणिस्तानातील परिस्थितीसह काही प्रादेशिक मुद्यांवर चर्चा झाल्याचे कुमार म्हणाले, मात्र अधिक तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. द्विपक्षीय चर्चेत तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रातील सहकार्यासारख्या अनेक मुद्यांचा समावेश होता असे ते म्हणाले.