भाजपशी गद्दारी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राज्यातील जनता निवडणुकीत धडा शिकवेल असा इशारा बिहारमध्ये अप्रत्यक्षपणे प्रचाराचा नारळ फोडताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिला.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे नाव न घेता मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर बोलताना सांगितले की, यावेळी १९७४ सारखी काँग्रेस विरोधी लाट देशात आहे. बिहारमधील जनतेने एनडीएला कौल दिला होता व आहे. १९७४ मध्ये झाले तसेच यावेळी होईल. लोक भाजपशी गद्दारी करणाऱ्यांना मतपेटीतून धडा शिकवतील.
ऑडिओ ब्रिज तंत्र
मोदी यांच्या राजकारण शैलीला नितीशकुमार यांचा विरोध असून मोदींना प्रचार प्रमुख करताच नितीशकुमार यांनी राज्यात भाजपपासून काडीमोड घेतला होता. मोदी यांनी ऑडिओ ब्रिज तंत्राच्या मदतीने बिहारमधील भाजप नेत्यांशी मोबाईलवर चर्चा केली. राज्यातील १,५०० नेत्यांशी ते बोलले. या नेत्यांचे तीन गट करण्यात आले. प्रत्येक गटाशी ते पाच मिनिटे बोलले. मोदी ज्यांच्याशी बोलले त्यात माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, माजी मंत्री अश्वनी चौबे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय मयुक व आमदार नितीन नारायण व विजय सिंग यांचा समावेश होता.
भाववाढ हा मोठा प्रश्न
बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी मोदी यांना सांगितले की, प्रत्येकजण मोदी पंतप्रधान होतील असे मत व्यक्त करीत आहे. त्यावर मोदी हसले. मोदी म्हणाले की, भाववाढ हा मोठा प्रश्न आहे, या प्रश्नासह इतर अनेक प्रश्नांवर भाजपने केंद्र सरकारशी दोन हात करावे. ते बघा, औरंगाबाद, बांका येथील नेत्यांशी बोलले व त्यांनी आपले भौगोलिक ज्ञान अचूक असल्याचे बोलताना दाखवून दिले.

—————————