नासाने शुक्राच्या वातावरणात सौरऊर्जाधारित हवाई वाहन पाठवण्याचे ठरवले असून त्यामुळे तेथे तरंगत्या ढगांचे शहर निर्माण करून मानवी वस्ती निर्माण करण्याची योजना आहे. शुक्र हा पृथ्वीला जवळ असलेला ग्रह आहे.
नासाच्या अ‍ॅनॅलिसिस अँड कन्सेप्ट्स डायरेक्टोरेट शाखेचे डेल आर्नी व ख्रिस जोन्स यांनी हा प्रस्ताव व्हर्जिनिया येथील लँगले केंद्रात मांडला आहे. मंगळावर जाण्याच्या आधी शुक्रावर जाणे शहाणपणाचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
नासाच्या हाय अल्टिटय़ूट व्हीनस ऑपरेशनल कन्सेप्ट या मोहिमेत (हॅवॉक) शुक्राच्या पृष्ठभागाऐवजी वातावरणाचा अभ्यास करण्याची योजना आहे. संशोधकांच्या मते शुक्राच्या वातावरणाच्या वरच्या भागात पृथ्वीसारखेच वातावरण असून तेथे वस्ती करता येईल. शुक्रावर ५० कि.मी. उंचीवर हवामानाचा दाब एक आहे व तो पृथ्वीपेक्षा थोडय़ा कमी गुरुत्वाचा आहे.
अवकाशवीर हे शुक्राच्या वातावरणातील प्रारणांपासून सुरक्षित राहू शकतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे कारण शुक्र सूर्यापासून आपल्या पृथ्वीपेक्षा ४० पटींनी जास्त सौर ऊर्जा घेतो व मंगळापेक्षा २४० पट अधिक सौर ऊर्जा घेतो. शुक्र व पृथ्वी यांच्या कक्षा कालांतराने जवळ येणार आहेत व त्यामुळे ४४० दिवसात ही मोहीम पूर्ण होईल असे आयईईईच्या बातमीत म्हटले आहे. मंगळावर जाऊन परत येण्यासाठी किमान ५०० दिवस लागतात. हॅवॉक मोहिमेत शुक्राच्या वातावरणात रोबोट सोडण्यात येईल व तो ३० दिवस तेथे राहील. त्यानंतर तेथे यान जाईल व तीस दिवस राहील. नंतरच्या मोहिमेत अवकाशयान दोन वर्षे तेथे जातील व कालांतराने माणसेही जातील व तेथे कायमस्वरूपी मानवी वस्ती तयार केली जाईल व ती तरंगत्या ढगांवर असेल.
हेलियमयुक्त सौरऊर्जाआधारित हवाई वाहन शुक्राच्या वातावरणाचा शोध घेईल व रोबोट (यंत्रमानव) हा ३१ मीटर लांब असेल तर प्रत्यक्ष मोहिमेतील यान १३० मीटर लांब असेल. त्या हवाई वाहनात राहण्याची सोय असेल त्याच्या खालच्या बाजूला दोन टप्प्याचे पंख असलेले रॉकेट असतील त्यांच्या मदतीने आपण शुक्रावरून अवकाशवीरांना परत आणू शकू, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

*शुक्रावर हवाई वाहन पाठवणार
*हे वाहन शुक्राच्या वातावरणात तरंगणार व त्यात मानवी वस्ती शक्य.
*शुक्राच्या वातावरणातील गुरुत्व पृथ्वीपेक्षा थोडे कमी.
*शुक्र ग्रह मंगळ व पृथ्वी पेक्षा सौरऊर्जा जास्त घेतो.