गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस यांनादेखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ या सध्या बंद पडलेल्या वर्तमानपत्राच्या लखनऊ आणि दिल्लीतील मालमत्ता कथितरीत्या हडप केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्यापासूनच काँग्रेसने या प्रकरणाला राजकीय स्वरूप दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज न्यायाल्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, सोनिया आणि राहुल गांधी न्यायालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच न्यायालयाकडून त्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोनिया आणि राहुल गांधी पटियाला हाऊस न्यायालयात दाखल झाले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हेदेखील न्यायालयात उपस्थित होते. सुनावणी सुरू झाल्यानंतर सोनिया आणि राहुल गांधी यांच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. सुब्रह्मण्यम स्वामी या जामिनाला विरोध दर्शविला. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत सोनिया आणि राहुल यांना जामीन मंजूर केला.  तत्पूर्वी आज सकाळपासूनच काँग्रेसकडून दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी भाजपविरोधात निदर्शने करून राजकीय वातावरण तापवण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करत कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सोनिया, राहुल यांच्यासह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया लिमिटेड यांच्याविरुद्ध न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. या नेत्यांनी समन्सला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देऊन ते रद्द करण्याची मागणी केली होती. हे समन्स रद्द करण्यात यावे, तसेच आपल्याला कनिष्ठ न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती राहुल आणि सोनिया यांनी केली होती, परंतु न्या. सुनील गौर यांनी सोमवारी त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या.