प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने केलेला गोळीबार म्हणजे सरळसरळ आक्रमण असल्याचा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. स्थितीच्या गांभीर्याचे आकलन होण्यात भारत असमर्थ ठरला आहे, असेही शरीफ यांनी म्हटले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील धुमश्चक्रीनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. नियंत्रण रेषेवरील गोळीबाराचा शरीफ यांनी निषेध केला आहे. भारताने केलेल्या गोळीबारात प्रवासी बसला लक्ष्य करण्यात आले. भारताच्या प्रत्युत्तरात ठार झालेल्या सैनिकांना शरीफ यांनी आदरांजली वाहिली आहे. भारताकडून सरळसरळ आक्रमण होत असतानाही आम्ही संयम पाळला आहे, भारताच्या हल्ल्यात निष्पाप नागरिक ठार झाले असून त्यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे, भारताल स्थितीच्या गांभीर्याचे आकलन झालेले नाही, असेही शरीफ यांनी म्हटले आहे.

काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाकडून मोठय़ा प्रमाणावर मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे त्यापासून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा भारत प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.