काश्मीर मुद्दय़ाचे निराकरण करण्यासाठी व्यापक, र्सवकष व निकाली चर्चा करण्यास येण्यासंबंधी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतास आमंत्रित केले आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करताना शरीफ यांनी भारतास हे निमंत्रण दिले. काश्मिरी जनतेच्या आशा-आकांक्षा लक्षात घेऊन काश्मीरचा तंटा सोडविला नाही तर या उपखंडात अविश्वास आणि तणावाचे वातावरण कायम राहील, असा इशाराही शरीफ यांनी दिला.
भारतीय नेतृत्वास या मुद्दय़ाची संवेदनशीलता चांगली ठाऊक असल्यामुळे चर्चा करण्याच्या आवाहनास त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि काश्मिरी जनतेस स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळण्याबद्दलही त्यांच्याकडून विचार होईल, अशी आशा शरीफ यांनी व्यक्त केली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंना भेडसावणाऱ्या समस्यांची पाकिस्तानला चांगली कल्पना असून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाकिस्तानने अनेक पावले उचलली असल्याचा दावा शरीफ यांनी केला. त्यामध्ये व्यापार आणि लोकांच्या चलनवलनासाठी नियंत्रण रेषा खुली करण्यात आली, असे सांगत त्यामुळेच पाकिस्तानला शांतता हवी आहे हे सिद्ध होते, असे त्यांनी नमूद केले.
शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या विधिमंडळात हे आवाहन केल्यामुळे या मुद्दय़ास वेगळे वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.