News Flash

भाजपविरोधात महाआघाडी तूर्त नाहीच!

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी भाजपवासी यशवंत सिन्हा यांनी ‘राष्ट्र मंच’ची स्थापना केली

नवी दिल्ली : काँग्रेसला डावलून भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नाही, असे स्पष्टीकरण ‘राष्ट्र मंच’ने मंगळवारी दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अडीच तास झालेल्या बहुचर्चित बैठकीनंतर महाआघाडीची शक्यता तूर्तास तरी संपुष्टात आली. या बैठकीत ८ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

बिगरभाजप-बिगरकाँग्रेस तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली असली तरी, ही बैठक राजकीय नव्हती. काँग्रेसला बाजूला सारून पवारांनी राजकीय पाऊल उचललेले नाही. पवारांच्या घरी ही बैठक झाली असली तरी तिचे आयोजन यशवंत सिन्हा यांनी केले होते, पवारांनी नव्हे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला निमंत्रण नसल्याने या घटक पक्षानेही या बैठकीला फारसे महत्त्व दिलेले नाही.

काँग्रेसचे कपिल सिबल, अभिषेक मनू सिंघवी, विवेक तन्खा, मनीष तिवारी, शत्रुघ्न सिन्हा या पाच काँग्रेस नेत्यांना बैठकीचे निमंत्रण होते; पण ते वैयक्तिक कारणांमुळे येऊ  शकले नाहीत. काँग्रेसवर बहिष्कार टाकून राजकीय चर्चा केलेली नाही. ‘राष्ट्र मंच’ हे काँग्रेसविरोधी व्यासपीठ नाही. समविचारी सर्व पक्षांना सहभागी करून घेतले जाईल, असे मेमन म्हणाले.

शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाल्याने त्यास राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. शिवाय, सोमवारी पवारांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली होती. प्रसारमाध्यमांमधील तिसऱ्या आघाडीच्या चर्चेनंतर ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीत राजकीय हेतू नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी बैठकीआधी स्पष्ट करण्यात आले. प्रशांत किशोर यांनीही तिसऱ्या आघाडीची शक्यता फेटाळली. बैठकीनंतर, अडीच तास चर्चा झाल्याचे यशवंत सिन्हा यांनी सांगितले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच ते निघून गेले. ‘तिसरी आघाडी तयार करणे हे लक्ष्य नव्हते. सर्वसामान्यांच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी समविचारी मंडळी एकत्र आली होती. राष्ट्र मंचची बैठक बरेच दिवसांत झालेली नव्हती. यशवंत सिन्हा यांनी बैठकीबाबत पवारांना सांगितल्यानंतर त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास होकार दिला,’ असे ‘राष्ट्र मंच’चे सदस्य पवन वर्मा म्हणाले. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी भाजपवासी यशवंत सिन्हा यांनी ‘राष्ट्र मंच’ची स्थापना केली असून मंगळवारी झालेल्या बैठकीत महागाई, बेरोजगारी, व्यक्तिस्वातंत्र्य आदी मुद्दय़ांवर चर्चा झाली. ‘राष्ट्र मंच’चे व्यासपीठ सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी असून संघर्षांसाठी नव्हे, असा युक्तिवाद समाजवादी पक्षाचे नेते घनश्याम तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केला.

या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या वतीने यशवंत सिन्हा, सपचे घनश्याम तिवारी, राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, आपचे सुशील गुप्ता, भाकपचे विनय विश्वम, माकपचे निलोत्पाल बसू, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीद मेमन, वंदना चव्हाण आदी नेते उपस्थित होते. शिवाय, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, जावेद अख्तर, काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा, जनता दल (संयुक्त)चे माजी सदस्य पवन वर्मा, निवृत्त न्या. ए. पी. शहा, के. सी. सिंग आदी मान्यवरही होते. मात्र, द्रमुक, बसप, तेलुगु देसम, तेलंगण राष्ट्र समिती तसेच अन्य भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांविना ही बैठक घेण्यात आली.

राहुल गांधींचे मौन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या संभाव्य आघाडीबाबत भाष्य करणे टाळले. ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आता फक्त करोनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे स्पष्ट केले. अन्य कुठल्याही गोष्टीमुळे विचलित होण्याची आवश्यकता नाही. राजकीय मुद्दय़ांवर बोलण्याची ही वेळ नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

भाजपची  टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संभाव्य आघाडी हा जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून अशी कितीही शून्ये एकत्र केली तरी त्यातून एक पूर्णांक तयार होत नाही. नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:24 am

Web Title: ncp chief sharad pawar rashtra manch meet anti bjp alliance zws 70
Next Stories
1 देशात संपूर्ण लसीकरणासाठी २०७ दिवस!
2 अडचणीच्या काळात भाजपची बघ्याची भूमिका- चिराग
3 उत्तराखंडमध्ये आयुर्वेद शाखेच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीच्या औषधांसाठी परवानगी
Just Now!
X