31 October 2020

News Flash

आघाडीत मतदारसंघ अदलाबदलीची आशा मावळली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावतंत्रासमोर काँग्रेसने लोटांगण घातले आहे. जागावाटपात २६-२२ सूत्र मान्य केल्यानंतर राष्ट्रवादीने ‘सोयीस्कर’ मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविल्याने मतदारसंघ अदलाबदलीची शक्यता मावळली आहे.

| February 12, 2014 12:39 pm

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावतंत्रासमोर काँग्रेसने लोटांगण घातले आहे. जागावाटपात २६-२२ सूत्र मान्य केल्यानंतर राष्ट्रवादीने ‘सोयीस्कर’ मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविल्याने मतदारसंघ अदलाबदलीची शक्यता मावळली आहे. कोल्हापूरसाठी आग्रही असणाऱ्या काँग्रेसला ‘समज’ देण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अखेर यश आले.
राष्ट्रवादी काँग्रेस संपुआतून बाहेर पडल्यास त्याचा देशभर वाईट संदेश जाईल, या भीतीपोटीच काँग्रेसने हे सूत्र मान्य केले. जागावाटपानंतर मतदारसंघ अदलाबदलीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश व राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते प्रफूल्ल पटेल यांच्यात आज बैठक झाली. बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
राज्यसभा खासदार ईश्वरलाल जैन यांचे चिरंजीव व अपक्ष आमदार मनीष जैन यांच्यासाठी रावेर मतदारसंघ सोडण्याची चाचपणी राष्ट्रवादीने केली होती. आ. जैन यांनी आज नवीन महाराष्ट्र सदनात ठाकरेंशी दिल्लीत चर्चा केली. त्यामुळे रावेर व कोल्हापूर मतदारसंघाची मागणी काँग्रेसने केल्याची चर्चा सुरु होती. मात्र मतदारसंघांच्या अदलाबदलीविषयी माणिकराव ठाकरे यांना विचारले असता, तशी शक्यता जवळ जवळ नसल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, कोल्हापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. त्यावर चर्चा होईल. लोकसभा मतदारसंघनिहाय चार जणांची समन्वय समिती नेमण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. समितीत दोन राष्ट्रवादी तर दोन काँग्रेसचे पदाधिकारी असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2014 12:39 pm

Web Title: ncp not ready to exchange constituency with congress
Next Stories
1 ४० बँकांमधील अनुत्पादक मालमत्ता सव्वा दोन लाख कोटी
2 डिझेल मोटारींवर जादा कर आकारण्याबाबत केंद्राला नोटीस
3 ईशान्य भारतीयांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच
Just Now!
X