सिगारेट ओढणे आरोग्यासाठी घातक असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित असते. सिगारेट ओढणाऱ्यांनाही याची कल्पना असते. मात्र हे व्यसन काही केल्या सुटत नाही आणि आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असतात. सिगारेट ओढणे आरोग्यासाठी घातक असते हे सांगणारे संदेश आणि छायाचित्रे सिगारेटच्या पाकिटावर दिलेली असतात. सिगारेटमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाची चित्रे यावर असतात. मात्र या संदेशामध्ये आता आणखी एक भर पडणार आहे. आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून नव्याने काही छायाचित्रे सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर असतील.

१ सप्टेंबरपासून उत्पादित केल्या जाणाऱ्या सिगारेटच्या पाकिटांवर याचा वापर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, तंबाखूजन्य पदार्थांवर तंबाखूमुळे कर्करोग होतो आणि तंबाखूमुळे मृत्यूला सामोरे जावे लागते असे लिहीलेले असायला हवे. तसेच लाल रंगावर पांढऱ्या अक्षरात हे असायला हवे असे सांगण्यात आले आहे. तसेच काळ्या रंगावर पांढऱ्या अक्षरात ‘क्वीट टुडे कॉल १८००-११-२३५६’ हेही चित्रांसोबत देण्यात येणार आहे. ज्यांना सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे अशांसाठी ही हेल्पलाईनची सुविधा देण्यात येणार आहे.

तंबाखूपासून दूर राहण्यासाठी लोकांना साक्षर करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. आता सरकारने दोन सेट तयार केले असून पहिला सेट १ सप्टेंबर २०१८ पासून वापरण्यात येणार आहे. तर चित्रांचा दुसरा सेट १ सप्टेंबर २०१९ पासून वापरण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून याबाबतच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. सिगारेटच्या आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सर्व पाकिटांवर मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचना असतील याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.