28 September 2020

News Flash

प्रकाशप्रदूषणाचा नवा नकाशा तयार करण्यात यश

पृथ्वीवरील एक तृतीयांश लोकांना आकाशगंगा पाहायलाच मिळत नाही

| June 12, 2016 02:16 am

पृथ्वीवरील एक तृतीयांश लोकांना आकाशगंगा पाहायलाच मिळत नाही कारण कृत्रिम दिव्यांमुळे प्रकाशप्रदूषण होत असते. आता प्रकाशप्रदूषणाचा नवा जागतिक नकाशाच वैज्ञानिकांनी तयार केला आहे. कृत्रिम दिव्यांनी रात्रीचे आकाश जगातील ८० टक्के लोकसंख्येसाठी प्रकाश प्रदूषणाने झाकोळलेले असते. इटलीतील लाइट पोल्यूशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत फॅबियो फालची व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाशप्रदूषणाचा हा नकाशा तयार केला आहे. त्यात लोकसंख्या व पृथ्वीवरील दिव्यांमुळे झालेले प्रकाशप्रदूषण यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व देशांमधील माहितीचा त्यात समावेश आहे.
राष्ट्रीय व जागतिक प्रकाशप्रदूषणाची तुलनाही करण्यात आली आहे. हा नकाशा कृत्रिम प्रकाशाचे स्रोत शोधण्याचे एक साधन म्हणून उपयोगी पडणार आहे. आरोग्य व परिसंस्थात्मक दुष्परिणामांचा अभ्यासही त्यामुळे शक्य होणार आहे. जागतिक पातळीवर प्रकाश प्रदूषण कुठे कमी व कुठे जास्त आहे हे त्यातून समजणार आहे. प्रकाशाचे प्रदूषण हा खगोलशास्त्रज्ञांसाठी डोकेदुखीचा भाग असतो कारण रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण कृत्रिम प्रकाशामुळे शक्य होत नाही. सायंकाळच्या वेळी सामान्य लोकांनाही निरीक्षण शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाची तीव्रता थोडी वाढली तरी त्यामुळे आकाशनिरीक्षणाचा अनुभव उणावतो. प्रकाशाच्या प्रदूषणाचे अनेक पर्यावरण धोकेही असून त्याकडे तरीही दुर्लक्ष केले जाते. महासागरातील आवाजाप्रमाणेच कृत्रिम प्रकाशप्रदूषणाचे मापन करण्याचे प्रयोग फारसे झालेले नाहीत. दहा वर्षांपूर्वी फालची व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीच्या आकाशाचा नकाशा तयार केला होता त्यात प्रकाशाचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात दिसून आले होते. आता त्यांनी या नकाशात सुधारणा केली असून नवीन साधनांचा वापर करून उपग्रहाने दिलेल्या माहितीचा वापर केला आहे. यात अमेरिका व युरोपात प्रकाशाचे प्रदूषण ९९ टक्के आहे.
कृत्रिम प्रकाशाची तीव्रता इतकी जास्त असते की, त्यामुळे खगोलीय निरीक्षणे शक्य होत नाहीत. सिंगापूरसारख्या ठिकाणी प्रकाशाचे प्रदूषण खूपच जास्त आहे. तेथे रात्रीचे खरे आकाश कधीच प्रत्ययाला येत नाही. ते कृत्रिम प्रकाशाने झाकोळून जाते. कृत्रिम प्रकाश इतका तीव्र असतो की, साध्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहिले तर प्रकाशच दिसतो. चॅड या मध्य आफ्रि केतील देशात तसेच मादागास्कर येथे प्रकाशाचे प्रदूषण फारच कमी आहे. तेथे तीन चतुर्थाश लोकांना आकाश मूळ स्वरूपात पाहायला मिळते. दिवसा निळे व रात्री काळे आकाश प्रगत देशातील शहरांमध्ये पाहायला मिळत नाही. सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2016 2:16 am

Web Title: new maps depict worlds light pollution problem
टॅग Nasa
Next Stories
1 मतांच्या फाटाफुटीचे ग्रहण
2 भाजप कार्यकारिणीची आजपासून अलाहाबाद येथे बैठक
3 जेएनयूतील ‘तो’ व्हिडीओ खराच
Just Now!
X