मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी अबू जुंदाल याच्या जिवाला धोका असल्यामुळे त्याच्यावरील खटल्याची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केली जावी, अशी विनंती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्लीच्या न्यायालयाला केली आहे. सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कैद असलेला अबू जुंदाल ऊर्फ सईद झबिउद्दीन अन्सारी याला कारागृहातून न्यायालयात घेऊन जातेवेळी त्याचे विरोधक त्याला ठार मारू शकतात किंवा त्याचे अपहरण करू शकतात, अशी भीती महाराष्ट्र सरकारने मे २०१३ मधील एका ठरावाद्वारे व्यक्त केली होती. त्यामुळे त्याला दिल्लीत हजर केले जाऊ शकत नाही, अशी माहिती एनआयएने दिली. तथापि, जुंदाल याचा खटला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालवला गेल्यास आपण अशिलाशी योग्य प्रकारे संवाद साधू शकणार नाही व परिणामी आपल्या बचावावर परिणाम होईल, असे जुंदालचे वकील एम.एस. खान यांनी जिल्हा न्यायाधीश अमर नाथ यांना सांगितले; तथापि या मुद्दय़ावर जुंदालचे मत मागवण्यासाठी आपण त्याला पत्र लिहू, असे खान यांनी म्हटल्यावर न्यायालयाने खटल्याची सुनावणी ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. मुंबईतील दहशतवादी हल्ला आणि औरंगाबाद येथील शस्त्रसाठा प्रकरणासह भारतात दहशतवादी कारवायांचा कट केल्याबद्दल एनआयने जुंदालवर आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीत दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी जलदगतीने होणे आवश्यक असून, ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जावी, असा अर्ज त्यांनी न्यायालयात केला आहे.