चार दशलक्ष पौंडांची हमी देण्याची, तसेच स्वत:ला नजरकैदेत ठेवण्याची तयारी फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याने दाखवल्यानंतरही ब्रिटनच्या न्यायालयाने बुधवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे नीरवला मोठा धक्का बसला आहे.

पंजाब नॅशनल बँकेत सुमारे २ अब्ज डॉलरचा घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात भारतात प्रत्यार्पणाची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या ४८ वर्षांच्या नीरवला त्याने जामिनासाठी चौथ्यांदा केलेल्या प्रयत्नात वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे हजर करण्यात आले. नीरव मोदी याने यापूर्वी न्यायालयात २ दशलक्ष पौंडांची हमी सादर करण्याचा प्रस्ताव दिला होता, तो आता दुप्पट केला आहे. तसेच ज्याप्रमाणे संशयित दहशतवाद्यांना नजरकैदेत ठेवले जाते, त्याचप्रमाणे स्वत: नजरकैदेत राहण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले.

नीरववर मे २०२० मध्ये खटला चालणार आहे. त्यावेळी तो न्यायालयात शरण येईल किंवा तो साक्षीदारांवर प्रभाव टाकणार नाही याबाबत आपल्याला खात्री वाटत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी त्याला जामीन नाकारला. तथापि, गेल्या सुनावणीच्या वेळी नीरव याच्या मानसिक स्थितीबाबत गोपनीय वैद्यकीय अहवालात नमूद केलेली महिती माध्यमांपर्यंत पोहचल्याबाबत नाराजी व्यक्त करून, यापुढे असे घडू नये अशी तंबी त्यांनी दिली.