केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारमन यांनी डिफेन्स बजेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. फेब्रुवारी महिन्यात हंगामी अर्थसंकल्प सादर करताना संरक्षण क्षेत्रासाठी ज्या तरतुदी केल्या होत्या. त्याच कायम ठेवल्या आहेत.

देशाच्या अर्थमंत्री म्हणून पहिला अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमन यांनी संरक्षण साहित्याच्या आयातीला सीमा शुल्कातून वगळले आहे. त्यामुळे संरक्षण साहित्याच्या आयातीवर सीमाशुल्क लागू होणार नाही.

संरक्षण क्षेत्राला तात्काळ आधुनिकीकरण आणि सुधारणेची गरज आहे. हा राष्ट्रीय प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या संरक्षण साहित्याला सीमा शुल्कातून वगळण्यात येत असल्याचे सीतारमन यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीआधी एक फेब्रुवारीला २०१९-२० साठीचा हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी ४.३१ लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.