अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना आर्थिक प्रगतीसाठी गोष्टी आयात करण्यात काहीच चूक नसल्याचे मत नोंदवलं. मात्र त्याचवेळी त्यांनी गणपतीच्या मूर्तीही चीनमधून आयात कराव्या लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उद्योग धंद्यांसाठी भारतामध्ये उपलब्ध नसलेल्या कच्च्या मालाची आयात करण्यात काहीच गैर नाही असंही सीतारामन म्हणाल्या. गुरुवारी सीतारामन यांनी तामिळनाडूमधील भाजपा कार्यकर्त्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

“भारतामध्ये निर्माण होणाऱ्या गोष्टींचे उत्पादन वाढत असेल आणि रोजगार निर्मिती होत असेल अशा उद्योंगांसाठी वस्तू आयात करण्यात काहीच गैर नाहीय. अशा पद्धतीची आयात नक्कीच झाली पाहिजे. मात्र त्याचवेळी रोजगार वाढण्यास मदत न करणाऱ्या आणि आर्थिक वाढीला हातभर न लावणाऱ्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला काहीच फायदा होत नाही. भारतला आत्मनिर्भर बनवण्यात अशा गोष्टींचा हातभार लागत नाही,” असं मत सीतारामन यांनी व्यक्त केलं.

“दरवर्षी गणेश चतुर्थीला अनेकजण स्थानिक मुर्तीकारांकडूनच पारंपारिक पद्धतीच्या गणेश मुर्ती विकत घेतात. मात्र आज या मुर्ती ही चीनमधून आयात केल्या जात आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली. आपण भारतामध्ये गणेश मुर्ती निर्माण करु शकत नाही का?,” याचा विचार करणं गरजेचं आहे असंही सीतारामन यांनी म्हटलं.

“साबणाचे डब्बे, प्लॅस्टीकच्या वस्तू, आगरबत्त्यांसारख्या घरगुती वापरच्या वस्तूंची भारतामध्ये लघू तसेच मध्यम स्तरावरील उद्योगांच्या माध्यमातून निर्मिती केली जाते. असं असतानाही या वस्तू चीनमधून आयात केल्या जातात. असं केल्यास त्याचा भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. त्यामुळेच अशा वस्तूंची आयात करु नये,” असं मत सीतारामन यांनी मांडलं.

भारत बऱ्याच काळापासून आत्मनिर्भर आहे. मात्र हळूहळू ते कमी होताना दिसत आहे म्हणूनच आता स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत मोहीम हाती घेण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. मात्र त्याचवेळी आयात पूर्णपणे बंद करावी असा आत्मनिर्भर भारतचा अर्थ होत नाही असेही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.