बिहारच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण दररोज वेगवेगळ्या कारणांनी तापू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मोदी यांनी आपल्या डीएनएबद्दल केलेले वक्तव्य हा बिहारमधील जनतेचा अपमान असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे, तर भाजपने नितीशकुमार यांच्यावर पलटवार केला आहे.
निवडणूक प्रचारात ‘बिहारचा सन्मान’ ही मुख्य संकल्पना होती, त्यामुळे नितीशकुमार यांनी मोदी यांना पत्र पाठविले आहे. मोदींच्या पदाला अशोभनीय असल्याने त्यांनी डीएनए वक्तव्य करणे अनावश्यक होते, असे नितीशकुमार म्हणाले. मोदी यांचे वक्तव्य हा राज्याचा अपमान असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. नितीशकुमार यांनी आपल्या उद्धटपणाची बिहारशी तुलना करू नये, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. तर नितीशकुमार काँग्रेसच्या कळपात असल्याने त्यांनाच संभ्रम निर्माण झाला असल्याची टीका सुशील मोदी यांनी केली.

मोदी यांनी वक्तव्य मागे घ्यावे, त्यामुळे जनतेच्या भावनांची कदर होईल आणि त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढेल.
-नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार