पाटणा : देशात करोनाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या अधिकृत निवासस्थानामधून बाहेर न पडल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जोरदार टीका केली आहे.

प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दल पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना काही दिवसातच पक्षाचे राष्ट््ररीय उपाध्यक्ष करण्यात आले होते, मात्र बिहारमध्ये करोनाचा फैलाव होत असताना सत्तारूढ एनडीएचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष असल्याची टीका करणारे ट्वीट किशोर यांनी केल्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य जनता घरातून बाहेर पडली तर त्यांच्या जिवाला धोका नाही, असे करोनाच्या भीतीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून निवासस्थातून बाहेर न पडणाऱ्या नितीशकुमार यांना वाटते का, असे किशोर यांनी ट्वीट केले आहे.

बिहारमध्ये करोनाचे सहा हजारांहून अधिक रुग्ण आढळलेले असतानाही राज्यात करोनापेक्षा विधानसभा निवडणुकीचीच चर्चा अधिक असल्याची टीकाही किशोर यांनी केली आहे.

प्रशांत किशोर यांच्यासह तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार हे निवासस्थानातून बाहेर पडत नसल्याबद्दल त्यांच्यावर डरपोक अशी टीका केली आहे.