बिहारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर आपल्या भाषणादरम्यान व्यत्यय आणणारे विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी नेते यांना माझ्या मांडीवर खेळला आहेस असा टोला लगावला आहे. २०१७ मध्ये जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांचं युतीचं सरकार कोसळलं. या सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते.

तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या भाषणादरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असतानाच्या कार्यकाळाची आठवण करुन दिली. यावरुन नितीश कुमार यांना टोला लगावत म्हटलं की, “जेव्हा आमम्ही तिथे मंत्री होतो तेव्हा तुम्ही मांडीवर खेळत होतात. आम्ही तुम्हाला मांडीवर खेळवलं नाही का?”.

आणखी वाचा- “राजासारखे वागू नका, जमीनीशी नातं सांगणारं नेता व्हा”, मोदींचा भाजपा नेत्यांना सल्ला

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमार राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत होते. नितीश कुमार यांनी यावेळी गेल्या १५ वर्षात सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवत असताना वारंवार तेजस्वी यादव त्यामध्ये व्यत्यय आणत होते. यामुळे नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना सुनावलं आणि म्हटलं की, “तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते नंतर सांगा, पण मी काय सांगतो ते आधी ऐका…यामुळे तुमचा फायदाच होणार आहे”.

आणखी वाचा- खुलं पत्र : “मोदीजी, रोजगार मागणाऱ्यांच्या हाती तुम्हीच मंदिराच्या वर्गणीचं पावती पुस्तक द्या”

यानंतर आपल्या भाषणात तेजस्वी यादव यांनी भाजपा-जदयू सरकारला राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन घेरलं. इतकंच नाही तर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार भाजपाची स्टेपनी असल्याचा टोला लगावला.