तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण आणि उन्नावमधील बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याच्या घटनेमुळे देशात संताप व्यक्त केला जात आहे. दिवसेंदिवस महिलांसोबत घडणाऱ्या आत्याचाऱ्याच्या घटनेमुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनांनंतर सर्वसामान्यांपासून राजकीय क्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन विश्वातील अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी गुन्हा सिद्ध झाल्यास बलात्काऱ्यांना महिन्याभरात फासावर लटकावा असा सल्ला दिला आहे.

खासदार नुसरत जहां यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त करत गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीचा उपाय सुचवला आहे. ‘नाही म्हणजे नाहीच. कायदा कितीही कठोर असला तरी प्रशासन आणि पोलिसांनी जबाबदारीने वागायला हवं. जामीन नको. माफी नको. दोषी ठरल्यास एका महिन्यात फासावर लटकवा’ असं ट्विट नुसरच यांनी केलं आहे.

शुक्रवारी नुसरत यांनी ट्विट करत हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं होते.

तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. काही जणांकडून पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. तर काही जणांकडून याला विरोध होत आहे.